शरीरापल्याडचं माणूसपण

  • प्रतीक पुरी

पल्या तथाकथित उच्च संस्कृतीच्या, श्रेष्ठ परंपरेच्या समाजाने तृतीयपंथीय समूहावर बहिष्कार घालून, त्यांना गुलामासारखं राबवून आपल्यापासून कायमच दूरच ठेवलं आहे. पण हा समाज आता आपल्या हक्कांविषयी जागृत झाला आहे. आपल्या समाजात आपण आणि ते अशी एक विभागणी फार पूर्वीपासून करण्यात आली आहे. या ‘ते’ गटात समाजातील सर्वच शोषितांचा, वंचितांचा, अन्यायग्रस्तांचा समावेश होत असतो. ते मग कधी दलित असतात, कधी वेश्या असतात, परकीय असतात, बंडखोर असतात. थोडक्यात काय तर आपल्या तथाकथित सभ्य समाजाला अप्रतिष्ठत वाटणाऱया सर्व घटकांचा या गटात समावेश होतो. यातील एक घटक आहे तृतीयपंथीयांचा. ज्यांना आपण हिजडे म्हणून ओळखतो. हे नाव ऐकताच आपल्या मनात किळस येते, तिरस्कार उमटतो आणि रागही येतो. आपल्या तथाकथित उच्च संस्कृतीच्या व श्रेष्ठ परंपरांच्या समाजाने या समूहावर बहिष्कार घालून किंवा त्यांना गुलामासारखं राबवून आपल्यापासून कायमचं दूरच ठेवलं आहे. पण आता हा समाज आपल्या हक्कांविषयी जागृत झाला आहे आणि माणूसपणाच्या आपल्या अधिकाराच्या मागणीविषयी तो आग्रहानं आपलं म्हणणं मांडत आहे.

मुळात तृतीयपंथी कोणाला म्हणायचं हे समजून घ्यायला हवं. आपण शरीरावरून त्या त्या माणसाचं लिंग ठरवत असतो. पण त्याच्या मनाकडे मात्र कायमच दुर्लक्ष करतो. मनाला लिंग असतं आणि शरीरापेक्षांही ते जास्त प्रभावी ठरतं ही गोष्ट आपण अज्ञानानं किंवा सोयीनं तरी विसरून जातो. मग स्त्री देहात पुरुषी मन असेल तर तिला पुरुषी, बाप्या म्हणून हिनवण्यात येतं. पुरुषी देहात स्त्रीमन असेल तर त्याला बायल्या, छक्का म्हणून छळण्यात येतं. यातही आपल्या समाजाची पुरुषी वर्चस्ववादी भूमिका उठून दिसते. कारण एखाद्या पुरुषी देहात असलेल्या स्त्री मनाची विटंबना करण्याकडे त्यांचा जास्त कल असतो. त्यामानानं स्त्री देहातील पुरुषी वृत्तीला तितका त्रास होत नाही. म्हणजे इथेही पुन्हा स्त्री वर अत्याचार आहेतच. मुळात तृतीयपंथी असा वर्ग मानणं हे चुकीचंच आहे. शरीराचा विचार न करता मनाचा विचार केला तर ही समस्या सोपी होते. त्यामुळे तृतीयपंथांना ‘इतर’ असा पर्याय देण्यापेक्षा त्यांना त्यांच्याविषयी जी स्त्री किंवा पुरुषी भावना महत्त्वाची वाटते त्यानुसार त्यांना त्याच गटात समाविष्ट करण्यात यायला हवं. अर्थात यासाठी सरकारनं कायदा करण्याची गरज तर आहेच, पण समाजानंही आपला पाठिंबा देण्याची आवश्यकता आहे.

सामान्य लोकांचा असा कल असतो की असा प्रकार माझ्या घरात होणार नाही. माझं मूल असं जन्माला येणार नाही. एकतर ही धारणा मनातून काढणं गरजेचं आहे. दुसरं हे की हे असलंच तर नैसर्गिक दुर्दैव आहे, शारीरिक अपघात आहे. तो काही त्या मुलाचा किंवा मुलीचा अपराध नाही आणि त्यामुळे त्याच्या जगण्याला मर्यादा येत नाही. मर्यादा समाजानं तयार केल्या, समाजानं त्यांना बहिष्कृत केलं, त्यांच्यावर आरोप केले, त्यांना अपशकुनी मानलं. व्यक्ती म्हणून कोणताही तृतीयपंथी हे अन्य कोणाही सामान्य माणसासारखेच असतात. मेंदू हा अलिंगी असतो आणि शरीराचे अन्य अवयवही, एक जननेंद्रिय सोडलं तर. त्याचा इतका बाऊ करण्याची काहीएक गरज नाही. समाज म्हणून आपण अन्य क्षेत्रात प्रगत होत असताना आपल्याच घरातील या सदस्यांवर आपण अन्याय करणं आता बंद करायला हवं. त्यांच्याशी संवाद साधण्याची, त्यांना समजून घेण्याची ही वेळ आहे. संवादाचे पूल जितके बांधले जातील तितके गैरसमज कमी होत जातील.

सुदैवानं काही तृतीयपंथीयांनी यासाठी पुढाकार घेतला आहे. लक्ष्मी त्रिपाठी हे नाव देशभरात गाजत आहे, तर अलीकडे आपल्या महाराष्ट्रात दिशा शेख ही यासाठी पुढाकार घेऊन काम करत आहे. ती स्वतःला बहुलिंगी समजते आणि त्यानुसारच आपला उल्लेख व्हावा यासाठी आग्रह धरते. “आपण शरीरापासून जन्माकडे प्रवास करतो. शरीराकडे पाहून स्त्री-पुरुष असं ठरवून टाकतो. त्यामुळे सगळा घोळ होत आहे. आपण जेव्हा आपल्या जन्मापासून शरीरापर्यंत प्रवास करायला लागू, तेव्हा स्त्री, पुरुष, बहुलिंगी हा गुंता उरणार नाही. शरीर आपलं लिंग ठरवणार नाही, तर आपल्या जाणिवा ते ठरवतील.’’ दिशा जेव्हा असे विचार मांडते तेव्हा ती किती सखोल विचार करते हे समजून येतं. ती एक उत्तम कवयित्री आहे, धडाडीची सामाजिक कार्यकर्ती आहे, नवनव्या गोष्टी शिकण्यासाठी अत्यंत आतूर आहे. तिच्या समाजातील नव्या जाणिवांनी प्रगल्भ होत असलेल्या पिढीची ती प्रतिनिधी आहे. या पिढीला माहिती तंत्रज्ञानानं आधार दिला आहे.

सामाजिक माध्यमांच्या हाताळणीतून त्या आपल्या भावना, आपले विचार, आपली स्वप्नं याविषयी मोकळेपणानं मांडणी करत आहेत. त्याला समाजानं, सरकारनं आधार द्यायला हवा. हा आधार कायद्याचा हवा. तो भावनिक हवा, आर्थिक हवा आणि सामाजिक व राजकीयही हवा. समाजानंही आपले पूर्वग्रह बदलून त्यांच्याशी संवाद साधायला हवा. सांगायला आनंद वाटतो की नवी पिढी हे काम करत आहे. त्यामुळे येत्या काळात अनेक सकारात्मक बदल नक्कीच घडतील. पण यासाठी सर्वांनी प्रयत्न करायला हवेत. ही आपली समाज म्हणून जबाबदारी आहे जी आपण टाळू शकत नाही. त्यांच्यात काहीही वैगुण्य नाही हे आधी मान्य करा. कोणत्याही फालतू धार्मिक नियमांचा, अंधश्रद्धांचा आधार घेऊन या लोकांना सतावणं आपण आता तरी बंद करायला हवं. आपल्या समाजानं जशी स्त्रीला एकीकडे पोथ्यापुराणांत देवीचा मान, तर दुसरीकडे व्यवहारात दुय्यम वागणूक दिली आहे तशीच वागणूक यांनाही दिली जाते. त्यांचे आशीर्वाद मिळणं शुभ मानलं जातं, पण त्यांना आपल्या जवळ मात्र येऊ द्यायचं नाही याकडे कटाक्षानं लक्ष दिलं जातं. हा ढोंगी दुटप्पीपणा आपण आता बदलायला हवा. ते जसे आहेत तसा त्यांचा आदरानं, सन्मानानं स्वीकार आपण करूयात. उपकार करण्याची भूमिका न घेता सहकार्याची भूमिका घेऊन त्यांना बरोबरीनं काम करण्याची संधी आपण द्यायला हवी. माणूस म्हणून, व्यक्ती म्हणून, मित्र म्हणून, समाजाचा एक जबाबदार घटक म्हणून त्यांच्याकडे आपण बघायला हवं. आपली मतं आपले विचार त्यांच्यावर लादण्यापेक्षा त्यांना काय वाटतं, त्यांना काय हवं आहे हे जाणून घेऊन त्यांच्या पूर्ततेसाठी आपण प्रयत्न करायला हवेत.

दिशा शेखसारखे कित्येक गुणी कलाकार, बुद्धिवंत या समाजात आहेत. बहिष्काराच्या घाणीत दडल्या गेलेल्या या हिऱ्यांना बाहेर काढण्याची ही वेळ आहे. दिशानं आपल्या एका कवितेत आपल्या नव्यानं गवसलेल्या सत्त्वाविषयी, आकांक्षाविषयी आत्मविश्वासानं मत व्यक्त करताना परंपरेच्या नावाखाली पुन्हा सामाजिक शोषणाला शरण जायला ठाम नकार दिला आहे. ती म्हणते,
उमेदीच्या पहाटेसाठी, स्वातंत्र्याच्या क्षितिजासाठी
परत ती नव्याने जन्माला आलीय. पण आता ती
सहस्त्र्ाावधी वर्षांच्या या शोषणाच्या यज्ञात
स्वतःची आहुती द्यायला नकार देतेय.
आता ती आणि तिच्या पिढय़ा
होणार नाहीत ….स्वाहा!

सामाजिक शोषणाचा हा यज्ञ उधळून लावून दिशासारख्या अनेकांचा जिवंत होम होण्यापासून सुटका करण्याचा निर्धार आपणही करुयात. महाराष्ट्र ही परिवर्तनाची पुरोगामी प्रयोगांची भूमी आहे. इथल्या मातीत हे नवं परिवर्तनही घडेल याचा विश्वास आपण सर्वांनी आपल्या कृतीतून या लोकांना देऊयात.

pratikpuri22@gmail.com