भाजपची ‘पारदर्शकता’ उघड

50
nitin-gadkari
नितीन गडकरी

नितीन गडकरी हे केंद्रातले कर्तबगार मंत्री मानले जातात. मात्र गोव्याचे प्रभारीपद सांभाळताना साम, दाम, दंड, भेदाचा वापर करून गडकरींनी पर्रीकर सरकार बनविण्यासाठी जी ‘कर्तबगारी’ दाखवली याची सध्या खमंग चर्चा सुरू आहे. वास्तविक राजकारणात सेटिंग चालतच असते, मात्र त्याचा ऊहापोह कोणी करत नाही. गडकरी पडले अघळपघळ. त्यांनी मोहीम फत्ते केली हे सांगण्याच्या नादात गोव्यापासून ते दिल्लीपर्यंतच्या पत्रकारांना असे काही किस्से रंगवून सांगितले की, त्यामुळे गडकरी अडचणीतच येण्याची चिन्हे आहेत.

वास्तविक, विधानसभेत भाजपपेक्षा काँग्रेसचे संख्याबळ जास्त असतानाही काँग्रेसला सत्तास्थापनेसाठी न बोलावण्याचा `दबाव’ राज्यपाल मृदुला सिन्हा यांच्यावर दिल्लीतून होताच. शिवाय पर्रीकरांचा उद्धार करणारे गोवा फॉरवर्ड पक्षाचे विजय सरदेसाई काही तासांत ‘मनोहर चालीसा’ वाचायला बसले. गडकरींनी मध्यरात्री २.३० ते पहाटे ५ वाजेपर्यंत सत्तास्थापनेसाठी पणजीच्या हॉटेलात केलेले ‘अथक प्रयत्न’ याचा साद्यंत वृत्तांत मीडियाला कथन केला आहे. हातचे असे काही राखून ठेवलेले नाही त्याबद्दलही गडकरींचे कौतुकच करायला हवे. वास्तविक, येनकेनप्रकारेण गोवा काबीज करायचे या उद्देशाने निवडून आलेल्या इतर आमदारांच्या कुंडल्या मांडण्यात आल्या. त्यामुळे धास्तावलेल्या सुदीन ढवळीकर, विजय सरदेसार्इंसारख्यांना नाइलाजाने भाजपची पाठराखण करावी लागली आणि पाच वेळा मुख्यमंत्रीपद सांभाळलेल्या काँग्रेसच्या प्रतापिंसग राणेंच्या चिरंजीवाला काँग्रेसची आमदारकी काही तासांतच सोडावी लागली. हे सगळे दिल्लीच्या इशाऱ्यावरून घडले. स्वच्छ कारभार आणि पारदर्शकतेचा दररोज आरोह-अवरोह करणाऱ्या भाजपने हा सगळा ‘रात्रीस खेळ चाले’चा अंक असा बेमालूमपणे रंगवला. राजकारणात खरे बोलण्यासाठीही एक जिगर लागते. गडकरींनी ती हिंमत दाखवली आहे. त्यानिमित्ताने भाजपची पारदर्शकताही उघड झाली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या