मेट्रो रेल्वेसाठी उखडून प्रत्यारोपित केलेल्या झाडांची दैना

सामना प्रतिनिधी । मुंबई

मेट्रो ३ मार्गादरम्यान आलेली झाडे मुळासकट उखडून त्यांचे इतरत्र प्रत्यारोपण केले गेले. परंतु प्रत्यारोपणानंतर त्या झाडांची योग्य निगा राखली जात नसल्यामुळे त्यांची दैना झाली आहे. त्यांना पुरेशा प्रमाणात पाणी दिले जात नसल्याने पालवी फुटलेली नाही, असा अहवाल उच्च न्यायालयाने यासंदर्भात नेमलेल्या कनिष्ठ वृक्ष समितीने बुधवारी दिला. या झाडांची निगा राखण्यासाठी महापालिकेची मदत घ्यायला हवी, असा सल्लाही या समितीने दिला आहे.

कुलाबा-वांद्रे-सिप्झ असा मेट्रो-३चा मार्ग आहे. त्यादरम्यान आलेली झाडे उखडून त्यांचे मुंबईतील अनेक ठिकाणी प्रत्यारोपण केले गेले आहे. उच्च न्यायालयाच्या कनिष्ठ वृक्ष समितीने या झाडांची अलीकडेच पाहणी केली होती. बहुतांश झाडांना पालवी फुटली नसल्याचे त्यांना दिसून आले. झाडांचे प्रत्यारोपण योग्य झाले आहे, परंतु त्यांची योग्य निगा राखली जात नाही, त्यांना पुरेशा प्रमाणात पाणी दिले जात नाही, असे समितीच्या निदर्शनास आले. समितीने सादर केलेल्या अहवालात त्याचा उल्लेखही केला आहे.

– वांद्रे शासकीय वसाहत आणि कांदिवली स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे प्रत्यारोपित केलेल्या झाडांना पुरेसे पाणी दिले गेलेले नाही. मुंबई मेट्रो रेल्वे महामंडळाने नेमलेली माणसे प्रत्यारोपित झाडांची काळजी घेत नाहीत. योग्य काळजी घेतली आणि पुरेसे पाणी दिले तर बहुतांश प्रत्यारोपित झाडांना पालवी फुटेल, असेही समितीने अहवालात म्हटले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या