यापुढे प्रत्येक रिक्षा-टॅक्सीत तक्रार नंबर

37

सामना ऑनलाईन । मुंबई

रिक्षा आणि टॅक्सीचालकांच्या मुजोरीला चाप लावण्यासाठी कडक धोरण स्वीकारण्यात आले आहे. याअंतर्गत मुजोर चालकांविरोधात प्रवाशांना तक्रार करता यावी म्हणून १८००२२०११० या टोल फ्री क्रमांकाचा स्टिकर प्रत्येक रिक्षा, टॅक्सीत चिकटवणे बंधनकारक करण्यात येईल. तसेच याबाबतचे फलक ठिकठिकाणी लावण्यात येतील, अशी माहिती परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी शुक्रवारी विधान परिषदेत दिली.

रिक्षा-टॅक्सीवाल्यांचे मुजोर वागणे, मनाला येईल त्याच ठिकाणचे भाडे स्वीकारणे, प्रवाशांशी वाद घालणे, रेल्वे स्थानकाबाहेरचा रस्ता अडवणे, वाटेल तिथे पार्किंग करणे, मीटरची छेडछाड करणे यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे, यासंदर्भात लक्षवेधी सूचना सदस्य आनंद ठाकूर यांनी उपस्थित केली. यावरील चर्चेदरम्यान विद्या चव्हाण, प्रवीण दरेकर, हेमंत टकले, प्रकाश गजभिये, गिरीश व्यास या सदस्यांनी रिक्षा आणि टॅक्सीचालकांच्या मुजोरीचे अनुभव सांगत त्यांच्यावर कडक कारवाईची मागणी केली. त्यावर उत्तर देताना दिवाकर रावते यांनी रिक्षा-टॅक्सीचालकांनी आपली वर्तणूक सुधारावी असे आवाहन केले.

चार लाख रिक्षा बेकायदा

राज्यात चार लाखांच्या घरात बेकायदेशीर रिक्षा आहेत, मात्र त्यांच्यावर कारवाई केली तर बेरोजगारीचा प्रश्न निर्माण होईल त्यामुळे या बेकायदा रिक्षाचालकांना पैसे भरून परवाना घेण्यासाठी मार्चपर्यंत मुदत देण्यात आली आहे. आवश्यकता भासल्यास ही मुदत एक-दोन महिन्यांसाठी वाढवण्यात येईल, असे रावते यांनी सांगितले.

रिक्षा-टॅक्सीचालकांविरोधात ३२ हजार गुन्हे

मुंबईत १८,३३७६ ऑटो रिक्षा आणि ६०१७६ टॅक्सी नोंदणीकृत आहेत. एप्रिल २०१७ ते जानेवारी २०१८ या कालावधीत १४७८८ वाहनांची तपासणी करण्यात आली आहे. त्यामध्ये ४३२८ वाहने दोषी आढळली असून १२९४ परवाने निलंबित करण्यात आले आहेत. जानेवारीपासून रिक्षा आणि टॅक्सीचालकांविरोधात ३२ हजार गुन्हे दाखल करून दंड वसूल करण्यात आल्याचे रावते यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या