रस्ते अपघातातील तरुणांचे बळी ही राष्ट्रीय हानी – परिवहनमंत्री दिवाकर रावते

417

हिंदुस्थान हा जगातील सर्वांधीक तरुण असलेला देश आहे. मागच्या सहा महिन्यात रस्ते अपघातात बळी गेलेल्यांपैकी ९० टक्के १९ ते ३५ वयोगटातील तरुण-मुले आहेत. तरुण हे राष्ट्राचे भविष्य असुन तरुणांचे अपघातात होणारा मृत्यू ही कुटूंबाची हानी असते. तसेच राष्ट्राची हानी देखील असते. त्यामुळे रस्ते सुरक्षा व वाहतुकीच्या नियमांचे प्रत्येकाने पालन करावे, असे आवाहन महाराष्ट्राचे परिवहनमंत्री तथा शिवसेनेचे नेते दिवाकर रावते यांनी हिंगोली येथे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाच्या उद्घाटन कार्यक्रमात बोलतांना केले.

हिंगोली येथील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाच्या नुतन इमारतीचे उद्घाटन परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी उद्योग राज्यमंत्री तथा हिंगोलीचे पालकमंत्री अतुल सावे, खासदार हेमंत पाटील, आमदार तानाजी मुटकुळे, आमदार डॉ. राहुल पाटील, आमदार विप्लव बाजोरीया, जिल्हा परिषद अध्यक्षा शिवराणी नरवाडे, शिवसेना जिल्हाप्रमुख संतोष बांगर, जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, पोलीस अधिक्षक योगेशकुमार, जि.प. सीईओ डॉ. ह.पी. तुम्मोड, जिल्हा समन्वयक दिलीप बांगर यांच्यासह परिवहन विभागाचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी पालकमंत्री अतुल सावे यांनी परवहन विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांबद्दल परिवहनमंत्री दिवाकर रावते यांचे आभार व्यक्त करुन अभिनंदन केले. तसेच खासदार हेमंत पाटील व आमदार तानाजी मुटकुळे यांनी इमारत बांधकामासाठी निधी उपलब्ध करुन दिल्याबद्दल आभार व्यक्त केले. तसेच परिवहन विभागाची रिक्त पदे भरण्याची मागणी केली. यावेळी रस्ते सुरक्षा पुस्तीकेचे विमोचन दिवाकर रावते यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करतांना रावते म्हणाले की, मंत्री पद हे सोपे नसते. मात्र, अभ्यासपुर्वक लक्ष घातल्यास क्रांतीकारी गोष्टी घडवता येतात. मागच्या पाच वर्षात परिवहन विभागाबाबत प्रश्न उपस्थित झाले नाहीत ही या विभागाच्या कामाची पोचपावती आहे.

आरटीओ अधिकाऱ्यांना घेतले फैलावर

काळी-पिवळी तसेच प्रवासी वाहतुक करणाऱ्या अन्य वाहन चालकांना रोजगार मिळतो. ते ठिक आहे. पण अनधिकृत व बेकायदेशीपणे ही वाहने रस्त्यावर धावतातच कशी? अशा शब्दात उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाच्या अधिकाऱ्यांना परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी फैलावर घेतले. रस्ते अपघातात अशा अनाधिकृत वाहनांमुळे हकनाक नागरिकांचा जीव जातो. त्यांचे कुटूंब उघड्यावर येते. त्यामुळे पासींग करुनच रस्त्यावर वाहन धावले पाहिजे, असेही रावते म्हणाले. तसेच आरटीओ कार्यालयात दलालांना थारा देऊ नका, अशी तंबीही परिवहनमंत्र्यांनी दिली. अवैध प्रवासी वाहतुक प्रकरणी परभणीचा एक आरटीओ अधिकारी आज निलंबीत केल्याचेही रावते यांनी भाषणात जाहीर केले. तर दारु पिऊन एसटी बस चालविणारा चालक दोन तासात निलंबीत होऊन घरी जाईल, असेही त्यांनी सांगितले.

औंढा नागनाथ येथे अभिषेक  

परिवहनमंत्री तथा शिवसेना नेते दिवाकर रावते यांनी औंढा नागनाथ येथे नागनाथ ज्योतिर्लिंग मंदिरात दर्शन घेऊन अभिषेक केला. दरम्यान, यावेळी उपजिल्हाधिकारी प्रवीण फुलारी व तहसीलदार पांडुरंग माचेवाड यांनी रावते यांच्यासह खासदार हेमंत पाटील, आमदार राहुल पाटील, जिल्हाप्रमुख संतोष बांगर यांचा सत्कार केला.

एबीएम शाळेत औक्षण करुन स्वागत 

परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी नारायणराव रावते शिक्षण प्रसारक मंडळाच्या एबीएम इंग्लिश शाळेत भेट दिली. तसेच शाळेच्या  इमारत बांधकामाची पाहणी केली. यावेळी हिंगोलीचे शिवसेनेचे दिवंगत शहरप्रमुख अशोक बांगर यांच्या मातोश्री मनकर्णाबाई बांगर यांच्याशी रावते यांनी संवाद साधुन हितगुज केली. एबीएम शाळेचे अध्यक्ष दिलीप बांगर यांनी रावते यांचे स्वागत केले. तर बांगर कुटूंबाच्या वतीने राखी बांधुन शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी हेमंत पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख संतोष बांगर, उपजिल्हाप्रमुख परमेश्वर मांडगे, सहसंपर्कप्रमुख डॉ. रमेश शिंदे, जिल्हा संघटक उध्दवराव गायकवाड, रामेश्वर शिंदे, भानुदास जाधव, जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब मगर, फकीरा मुंडे, जिल्हा युवा अधिकारी दिलीप घुगे, नंदकुमार खिल्लारे, उपसभापती गोपु पाटील, प्रकाश घुगे, आर.आर. पाटील, उमेश बांगर, राम कदम आदींसह शिवसैनिक उपस्थित होते.

 

आपली प्रतिक्रिया द्या