हंगामी वस्तीशाळांमध्ये मोठा भ्रष्टाचार, धडक कारवाईत झाली पोलखोल

91

उदय जोशी, बीड

स्थलांतरीत झालेले ऊसतोड कामगार, वीटभट्टी कामगार, दगडखाणी कामगार यांच्या पाल्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून बीड जिल्ह्यामध्ये निर्माण केलेल्या हंगामी वस्तीशाळा घोटाळे आणि भ्रष्टाचाराचे अड्डे झाले आहेत. महिन्याकाठी कोट्यवधी रुपयांना चुना लावण्याचे काम वस्तीधारकांनी केले असून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे यांनी आज हंगामी वस्तीगृहावर धाडीचा सर्जिकल स्ट्राईक केला. एकाच वेळी ५८७ वस्तीगृहाची झाडाझडती घेण्याची किमया जिल्हा प्रशासनाने करून दाखवली. तब्बल २५० पथके यासाठी तैनात करण्यात आली होती. या तपासणीतून लाभार्थी पाल्यांची खोटी उपस्थिती दाखवून शासनाची फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले आहे.

बीड जिल्ह्यामध्ये तब्बल ५८७ हंगामी वस्तीगृह उभारण्यात आली आहेत. या वस्तीगृहात १७ हजार ७३ मुले आणि १६ हजार ८६२ मुली अशा एकूण ३३ हजार ९३५ लाभार्थ्यांचा समावेश आहे. ऊसतोड कामगार, वीटभट्टीधारक, खाणकामगार स्थलांतरित झाले. त्यांच्यासोबत पाल्यांचेही स्थलांतर होऊन त्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी शासनाने जिल्हा परिषदेच्या माध्यमातून बीड जिल्ह्यामध्ये हंगामी वस्तीगृह उभारले.

महिन्याकाठी कोट्यावधी रूपयाचा खर्च हंगामी वस्तीगृहावर केला जातो. पालक स्थलांतरीत झाले असल्याने त्यांचे पाल्य या वस्तीगृहात राहून आपले शिक्षण पूर्ण करतात. मात्र शासनाच्या या योजनेला लुटण्याचे काम बीड जिल्ह्यामध्ये झाल्याचे उघड झाले आहे. बोगस लाभार्थ्यांची संख्या दाखवून कोट्यावधीला चुना लावण्याचे काम संस्थाचालकांनी केले. आतापर्यंत हा घोटाळा बिनभोबाट सुरू होता. मात्र बीड जिल्ह्यात नुकतेच आलेले मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे यांनी धडाकेबाज काम करत हा घोटाळा उघडकीला आणला आहे.

या कारवाईवेळी एकाचवेळी जिल्ह्यातील सर्व वस्तीगृहाची तपासणी करण्यात आली. त्यासाठी २५० पथके तयार करण्यात आली. प्रत्येक पथकामध्ये एक जिल्हाधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आला. तर पाच पथकामागे एक सुपरवायझरची नियुक्ती करण्यात आली. सकाळी आठ वाजता एकाच वेळी ५८७ वस्तीगृहाच्या तपासणीचे काम सुरू झाले. या पथकातील अधिकाऱ्यांकडे भ्रमणध्वनी देण्यात आले होते. या भ्रमणध्वनीच्या माध्यमातून वरिष्ठ अधिकारी क्षणाक्षणाला अहवाल घेत होते. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे जातीने ही सर्जिकल स्ट्राईक सांभाळत होते. दुपारपर्यंत बहुतांश वस्तीगृहाची तपासणी पूर्ण झाली.

या तपासणीत अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या. लाभाथ्र्यांच्या हजेरीसाठी बायोमेट्रीक पद्धत वापरण्यात आली होती. मात्र संस्थाचालकाने बोगस लाभार्थ्यांची संख्या दाखवत कॉम्प्युटरच्या माध्यमातून आपल्या माणसांकडून बायोमॅट्रिक पद्धतीत घोटाळा केल्याचे समोर आले. बहुतांश वस्तीगृहामध्ये केवळ ३० ते ४० टक्केच मुलांची उपस्थिती असल्याचे समोर आले. ज्या वस्तीगृहामध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळे होते. ते वस्तीगृह तपासणीच्या धाकाने एक दिवसापूर्वीच बंद करण्यात आले. बोगस लाभार्थी दाखवून वस्तीगृहाच्या माध्यमातून धंदा उघडणाऱ्या वस्तीगृह चालकांनी सरकारच्या अनुदानाची अक्षरश: लूट केल्याचे समोर आले.

आपली प्रतिक्रिया द्या