उपग्रहांची गर्दी

37

[email protected]

१९५७ पूर्वी पृथ्वीभोवतीचं अंतराळ बऱ्यापैकी ‘स्वच्छ’ होतं. म्हणजे अवकाशात सैराट घुमणारे छोटेमोठे दगडधोंडे गरगरत होतेच आणि त्यांची कायमची धास्तीही तशीच होती. पण ‘स्पुटनिक’ नावाचा  पहिला कृत्रिम उपग्रह रशियाने अंतराळात सोडला आणि हळूहळू तो मार्ग सर्वच राष्ट्रांनी चोखाळला. वैज्ञानिक प्रगतीच्या दृष्टीने ते एक पराक्रमी पाऊल तर होतंच आणि त्यातूनच पुढे ‘विश्व’ समजून घेण्याची माणसाची लालसा पूर्ण होणार होती.

बरं, अंतराळ एवढं विराट की माणसाने पाचपन्नास किंवा अगदी टनभार वजनाचे उपग्रह तेथे पाठवण्याने काय फरक पडणार? साहजिकच अंतराळ प्रवासाच्या पहिल्या पंचविशीत त्याविषयी कोणी फारसं बोललं नाही, परंतु नंतर जेव्हा विविध कारणांसाठी एकामागून एक कृत्रिम उपग्रहांनी पृथ्वीपार जाण्याचा धडाका लावला त्यातून अंतराळी गर्दीची समस्या निर्माण झाली. मध्यंतरी एका कृत्रिम उपग्रहाला एका जुन्या मोडक्या उपग्रहातून निसटलेल्या धातूच्या तुकडय़ाने धडक देऊन नुकसान केल्याची घटना घडली आणि अंतराळ कार्यक्रमात प्रगत असलेले हिंदुस्थानसह सारेच देश सावध झाले.

महिन्या-दीड महिन्यापूर्वी  आपल्या ‘इस्रो’नेच एकाच वेळी १०४ कृत्रिम उपग्रह अवकाशात सोडण्याचा विश्वविक्रम केला. त्या यशाबद्दल आपल्या शास्त्रज्ञांचं कौतुक करावं तेवढं थोडंच. त्यातील एक मोठा उपग्रह वगळता अन्य राष्ट्रांचे बरेच उपग्रह फारच लहान होते. अर्थात या सर्व उपग्रहांना त्यांच्या नियोजित कक्षेत ठेवणे ही सोपी गोष्ट नव्हती. ती गणिती करामत ‘इस्रो’ने लीलया करून दाखवली.

रिमोट सेन्सिंग किंवा हवामानाचा अंदाज घेणारे आणि इतर काही उपक्रमांसाठी वापरले जाणारे  कृत्रिम उपग्रह पृथ्वीपासून तीनशे ते आठशे किलोमीटर अंतरावरून पृथ्वीभोवती घिरट्या घालत असतात. त्यातले काही अल्पकालीन योजनेसाठीचे असल्याने अल्पजीवी असतात. म्हणजे एखाद्दोन वर्षांत त्यांचं अवतारकार्य संपतं. एवढे छोटे उपग्रह निकामी झाल्यावर पृथ्वीवर परत आणणं आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य नसतं. त्यांच्या प्रक्षेपणासाठीच आधी भरमसाट खर्च झालेला असतो. त्यात त्यांच्या परतीच्या ‘तिकिटा’चा खर्च कोण करणार? शेवटी ते बिचारे जमेल तितका काळ पृथ्वीभोवती निरुद्देश फिरत राहतात.

पुढच्या काळात त्यांची संख्या अशीच वाढत गेली तर काय होईल? त्यातच काही देश त्यांचे निरुपयोगी उपग्रह तोडून टाकतात. चीनने २००७ मध्ये त्याचा, हवामानाच्या माहिती संग्रहासाठी सोडलेला उपग्रह कालबाह्य झाल्याने तोडून टाकला. त्याचे २५०० तुकडे अंतराळात पसरले. २००९ मध्ये रशियाच्या एका उपग्रहाची इरिडियम मालेतल्या एका उपग्रहाशी टक्कर झाली. ती पृथ्वीसापेक्ष सॅनेटियाच्या वाळवंटावरच्या आकाशात झाली म्हणून बरं नाहीतर ते विनाशी तुकडे भरवस्तीत पडले असते.

अमेरिकेचे ‘स्कायलॅब’ असेच कोसळले. ते हिंदी महासागरात पडले. मोठ्या नागरी वसाहतीवर अशा मोठ्या अवकाशयानांचे तप्त आणि जळते अवशेष कोसळले तर कोण अनर्थ ओढवेल! पृथ्वीपासून साधारण चारशे ते पाचशे किलोमीटर अंतरावरचा पट्टा अनेक कृत्रिम उपग्रहांनी गजबजतो आहे. या अंतराळी ‘ट्रफिक जॅम’चं आपल्याला काय म्हणून चालणार नाही. शेजारच्या गावातली वाहतूककोंडी परवडली; पण ही डोक्यावरची तरंगती उपग्रहांची गर्दी माणसाच्या ‘कुंडली’त नव्यानेच प्रकटली आहे. सुदैवाने विज्ञान जगताला वेळीच जाग आली असून जपानने तर अंतराळ स्वच्छतेसाठी अवकाशी ‘झाडू’ धाडण्याचं आपण पूर्वी वाचलंच आहे. आताही काही ठोस उपाय सापडेल आणि हा कचरा प्रगतीच्या आड येणार नाही अशी अपेक्षा करण्यापलीकडे आपण काय करू शकतो.

आपली प्रतिक्रिया द्या