गुरुजींनी सांगितल्याने गुप्तधन शोधायला निघाला, 80 फूट खोदकामानंतर पोलिसांना पकडला

जमिनीखाली घबाड दडलं असून ते आपण शोधून काढल्यास मालामल होऊ अशी स्वप्ने पाहात मिटक्या मारणाऱ्यांची संख्या कमी नाहीये. जमिनीखाली दडलेला खजिना शोधून काढणं हे सोपं काम नसतं. जे फारच नशीबवान असतात त्यांना कधीकधी असं घबाड सापडतंही, मात्र बहुतांश लोकांच्या हाती निराशाच आल्याचं आजपर्यंत ऐकीवात आहे. हिंदुस्थानातही खजिन्याच्या मोहापायी नादावलेल्यांची संख्या मोठी असून त्यातल्या एकाला पोलिसांनी अटक केली आहे. खजिन्याच्या शोधात या पठ्ठ्याने 80 फूट खड्डा खणला आहे.

ही घटना आंध्र प्रदेशातील तिरूपतीमधल्या मंगलम भागातील आहे. मंकू नायडू नावाच्या माणसाने बीटीआर कॉलनी परिसराजवळ असलेल्या शेषचलम नावाच्या टेकडी परिसरात खोदकामाला सुरुवात केली होती. त्याने खोदकामासाठी 6 मजूर बोलावून आणले होते. शेषचलमच्या ज्या भागात खोदकाम सुरू होतं तो जंगलाचा एक भाग असल्याने तिथे फार कोणी येत नाही. गेलं वर्षभर मंकू आणि त्याचे मजूर इथे खोदकाम करत होते. मंकूला 120 फूट खोल खोदकाम करायचं होता आणि त्यातलं 80 फुटांचं खोदकाम पूर्ण झालं होतं.

रविवारी रात्री बीटीआर कॉलनीमध्ये राहणाऱ्या लोकांनी मंकू आणि मजूर जंगलाच्या दिशेने जाताना दिसले होते. त्यांच्यावर संशय आल्याने कॉलनीतील रहिवाशांनी पोलिसांना कळवलं होतं. एलिपीरी पोलिसांनी जंगलात शोधकामाला सुरुवात केली असताना त्यांना खोदकामाची जागा सापडली होती. त्यांनी खोदकाम करणाऱ्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांना हा प्रकार समजला होता. पोलिसांनी खोदकामाची पाहाणी केली असून आवश्यक ते पुरावे जमा केले आहेत.

मंकू नायडू हा 2014 साली अनकापल्ली भागातून तिरुपती इथे राहायला आला होता. रंगकाम करणाऱ्या मंकूची ओळख रमैय्या स्वामी नावाच्या व्यक्तीशी झाली होती. ते स्वंयंभू गुरुजी असल्याचं सांगितलं जातं. नायडूला त्यांनी शेषचलमच्या जंगलात जमिनीखाली घबाड असल्याचं सांगितलं होतं. त्यांच्या शब्दावर भरवसा ठेवून मंकूने खोदकामाला सुरुवात केली होती. गेल्या वर्षी रमैय्या स्वामींचा मृत्यू झाला होता, तरीही मंकूने खोदकामा सुरू ठेवलं होतं.

आपली प्रतिक्रिया द्या