बालक, वयोवृद्ध, महिलांशी आदराने, सौजन्याने वागा; वरिष्ठ निरीक्षकांनाही जबाबदार धरणार

महाराष्ट्र पोलीस अकादमीत यशस्वीरीत्या प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर 317 परिविक्षाधीन पोलीस उपनिरीक्षकांची शहरातील विविध पोलीस ठाण्यांत नेमणूक करण्यात आली आहे. या तरुण, तडफदार उपनिरीक्षकांना पोलीस आयुक्तांनी एक कानमंत्र दिला आहे. कोविड-19 च्या अनुषंगाने घातलेल्या नियमांचे उल्लंघन करणाऱया नागरिकांविरोधात कायदेशीर कारवाई करा. मात्र बालके, वयोवृद्ध, महिलांबरोबर सौजन्याने वागा असे सांगतानाच कोणत्याही प्रकारची तक्रार आल्यास त्याची गंभीर दखल घेऊन सक्त कारवाई करण्यात येईल असा इशारादेखील आयुक्तांनी दिला आहे.

परिविक्षाधीन उपनिरीक्षक हे अगदीच नवखे असल्याने त्यांनी कर्तव्य बजावताना सचोटी व जनमानसात पोलीस दलाची प्रतिमा उंचावली जाईल अशी वर्तणूक ठेवणे आवश्यक आहे. म्हणून पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी 317 परिविक्षाधीन उपनिरीक्षकांना सूचना केली आहे. आपत्ती व्यवस्थापन कायद्याचा भंग करणाऱया नागरिकांविरोधात कायदेशीर कारवाई करा, परंतु महिला, वयोवृद्धांशी सौजन्याने वागणे अपेक्षित आहे. त्यामुळे सचोटीने व प्रामाणिकपणे आपले कर्तव्य पार पाडा. मात्र कोणत्याही प्रकारची तक्रार आल्यास त्याची गंभीर दखल घेऊन सक्त कारवाई करण्यात येईल असा इशारा देतानाच संबंधित पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक यांनाही जबाबदार धरून त्यांच्यावरदेखील कारवाई करण्यात येईल अशी तंबीदेखील आयुक्तांनी दिली आहे.

उपायुक्त, अपर आयुक्तांनी मार्गदर्शन करावे

उपायुक्तांनी पोलीस ठाणे भेटीदरम्यान परिविक्षाधीन पोलीस उपनिरीक्षक यांच्या भेटी घेऊन त्यांना कर्तव्याबाबत मार्गदर्शन करावे व गैरवर्तणुकीपासून परावृत्त करावे असेही आयुक्तांनी आदेश दिले आहेत. शिवाय अपर पोलीस आयुक्तांनी सर्व पोलीस ठाणे हद्दीतील परिविक्षाधीन उपनिरीक्षकांचा वेळोवेळी ऑनलाइन अथवा समक्ष दरबार घ्यावा आणि त्यांच्या अडचणी समजून त्यांना योग्य ते मार्गदर्शन करावे असेही आयुक्तांनी सांगितले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या