
>> मानसी पिंगळे म. ल. डहाणूकर कॉलेज
ट्रेकिंग म्हटले की, ट्रेकिंग सूटमध्ये पाठीवर सॅक लावून डोंगरदऱयांत फिरणारी तरुणाई डोळय़ांसमोर येते. खरे तर ट्रेकिंगचे वेड सर्वांना असते. अगदी 45 वयोगटापुढील नागरिकही तितक्याच जोमाने ट्रेकिंगसाठी उत्सुक असतात. बोरिवली येथील आसमंत ट्रेकिंग ग्रुप गेल्या 17 वर्षांपासून वरिष्ठ नागरिकांसाठी ट्रेकचे आयोजन करत आहे.
आसमंत ट्रेकिंग ग्रुपमध्ये सात सदस्य आहेत. अक्षय मुळ्ये, संतोष भिडे, वैभव भोसले, प्रिया कराडकर, अश्विन लोखंडे, ईशान मोडक, प्राजक्ता सावंत अशी या सदस्यांची नावे आहेत. ट्रेकिंगची आवड आहे, मात्र तरुणपणी अनेकांना ट्रेकिंगच्या अनुभवापासून वंचित रहावे लागले, अशा लोकांना ट्रेकिंगला नेऊन तो आनंद मिळवून द्यावा, हा आसमंत ट्रेकिंग ग्रुपचा उद्देश आहे.
आसमंत ट्रेकिंग ग्रुपने आतापर्यंत आजोबा, हरिश्चंद्रगड, कुसूर काsंडेश्वर, रतनगड, अहिवंत गड, धोडप, कळसूबाई, अंधारबन, सांधण व्हॅली, राजमाची, राजगड, भास्करगड, पुंजरगड, सोंदाई तसेच कुवारी पास, सारपास, ब्रह्मताला यांसारख्या हिमालयातील ट्रेकिंगचे आयोजन केले आहे. सह्याद्री पर्वतरांगांतील ठिकाणांपासून हिमालय गाठण्याचा प्रवास या ग्रुपने केवळ युवा पिढी नव्हे, तर वरिष्ठ नागरिकांसह पार पाडला आहे.
फ्लेमिंगो दर्शनाचा उपक्रम
फ्लेमिंगो दर्शन हा आसमंत ट्रेकिंग ग्रुपचा एक खास उपक्रम आहे. याअंतर्गत भांडुप पंपिंग स्टेशन येथे फ्लेमिंगो पक्षी दाखवले जातात. ग्रुपतर्फे नुकतीच लेपक्षी, गंडिकोटा, बेलूम केव्हज्ची सहल आयोजित करण्यात आली होती. पुण्यातून अनेक जण या सहलीत सहभागी झाले.