पर्यावरणाची ‘ऐशी की तैशी’, नवी मुंबईत बिल्डरने केली 700 झाडांची कत्तल

651
प्रातिनिधिक फोटो

पामबीच मार्गालगत तिवराचे जंगल असलेल्या भूखंडावर गोल्फ कोर्स तसेच 17 निवासी इमारती बांधण्यास मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिली. हे प्रकरण सुप्रीम कोर्टात असतानाच मिस्त्री कन्स्ट्रक्शनने रविवारच्या सुट्टीचा फायदा घेत 700 झाडांची कत्तल केल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. या अमानुष वृक्षतोडीमुळे पर्यावरणप्रेमींमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून झाडे तोडताना विरोध होऊ नये म्हणून खासगी बाऊन्सर्स तैनात करण्यात आले होते.

पामबीच मार्गावरील एनआरआय कॉम्प्लेक्सनजीकचा सुमारे 35.5 हेक्टरचा भूखंड सिडकोने गोल्फ कोर्स आणि 17 निवासी इमारती बांधण्यासाठी एका बिल्डरला दिला आहे. मात्र या भूखंडावर मँग्रोव्हजचे जंगल असून ते तोडले जाऊ नये यासाठी पर्यावरणप्रेमींनी 2013 मध्ये मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली. या याचिकेवर सुनावणी सुरू असताना न्यायालयाने या प्रकल्पाला आणि भूखंडावरील झाडे तोडायला स्थगिती दिली. मुंबई उच्च न्यायालयाच्या या निर्णयाला सिडको आणि संबंधित बिल्डरने सर्वोच्च न्यायालयात आवाहन दिले आहे.

> सर्वोच्च न्यायालयात या खटल्याची सुनावणी सुरू आहे. अद्यापपर्यंत कोणताही निर्णय झालेला नाही. ही वस्तुस्थिती असताना मिस्त्री कन्स्ट्रक्शनच्या कामगारांनी रविवारी या भूखंडावरील 700 झाडांची बेकायदा कत्तल केली.

> ऑटोमॅटिक कटरमुळे चार तासांत जंगलाचा मोठा भाग त्यांनी सपाट केला. जेव्हा पोलीस घटनास्थळी आले, त्यावेळी त्यांचे झाडे तोडण्याचे काम पूर्ण झाले होते.

> पामबीचलगतच्या वादग्रस्त भूखंडावरील झाडाची झालेली बेकायदा कत्तल हा प्रकार दुर्दैवी आहे. त्यामुळे शहराच्या पर्यावरणाची अतोनात हानी झाली आहे.

> हा प्रकार न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात येणार असून सदर प्रकरणी पोलिसांतही तक्रार करण्यात येणार आहे, असे नवी मुंबई एन्व्हायरमेंट सोसायटीचे संदीप बांगिया यांनी सांगितले.

अवमान याचिका दाखल करणार!
मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिलेली असताना आणि सुप्रीम कोर्टात या प्रकरणाची सुनावणी सुरू असताना झालेल्या या वृक्षतोडीमुळे न्यायालयाचा अवमान झाला आहे. त्यामुळे याप्रकरणी न्यायालयात अवमान याचिका दाखल करण्यात येणार आहे, असे सामाजिक कार्यकर्ते सुनील अगरवाल यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या