नोजल स्प्रेमुळे कोरोनाला रोखण्यास मदत होणार; संशोधकांचा दावा

कोरोनाचा जगभरात प्रकोप सुरूच आहे. त्यातच अनेक कंपन्यांच्या लसीच्या चाचण्या अंतिम टप्प्यात असून लवकरच लस बाजारात येण्याची शक्यता आहे. मात्र, कोणतीही लस पूर्ण प्रभावी नसून कोरोना महामारी रोखण्यात यश येणार का, याबाबत संशोधकही साशंक आहेत. ब्रिटनच्या स्वानसी युनिव्हर्सिटीने समुद्री शेवाळांपासून नाकाद्वारे घेण्यात येणारे औषध बनवले आहे. हा नोजल स्प्रे कोरोना रोखण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल, असा दावा संशोधकांनी केला आहे. हे औषध कोरोनाविरोधात किती प्रभावी आहे, याच्या चाचण्या सुरू करण्यात आल्या आहेत.

शहरातील 480 स्वयंसेवकांवर या लसीच्या चाचण्या करण्यात येत आहेत. या नोजल स्प्रेची किंमत 5.99 युरो म्हणजेच 531.76 रुपये असेल. या स्प्रेमध्ये कॅरेटेलोज, आईऔट-कॅरेजेननचे एक पेटेंट आणि समुद्री शेवाळांचा वापर करण्यात आल्याचे संशोधकांनी सांगितले. हा स्प्रे सर्दी आणि फ्लू सारखी लक्षणे असलेल्यांवर प्रभावी असल्याचे संशोधकांनी सांगितले. वेल्स ऑनलाईनने याबाबतची माहिती दिली आहे.

हा स्प्रे कोरोना फैलावास रोखू शकतो काय, यावरही चाचणीमध्ये अभ्यास करण्यात येणार आहे. कोरोनाबाधितांच्या आरोग्याची देखभाल करणारे आरोग्यसेवक, जोखीम असणाऱ्या व्यक्ती यांना या औषधाचा रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी उपयोग होणार आहे. तसेच कोरोना महामारीचा प्रभाव कमी करण्यासाठी आमचा प्रयत्न असल्याचे क्लिनिकल ट्रायलचे प्रमुख संशोधक डॉ.जीता जेसोप यांनी सांगितले.

ईऔटा कॅरेजेननवर आधारित नोजल स्प्रे एसएआरएस-कोव -2 सारख्या व्हायरसवर प्रभावी ठरला आहे. त्यामुळे ही महामारी रोखण्यातही हा प्रभावी ठरेल, असे संशोधकांनी सांगितले. याबाबत सुरू असलेल्या चाचण्यांमधून सकारात्मक निष्कर्ष आल्यास कोरोनाविरोधातील लढाईत पर्यायी औषध म्हणून याचा वापर करता येईल आणि कोरोनाविरोधातील आपल्या लढाईला बळ मिळेल, असे जेसोप यांनी सांगितले.

कॅरेजलोस हे प्रामुख्याने समुद्रात आढळणारे लाल शेवाळ आहे. सर्दी आणि फ्लूचा फैलाव रोखण्यासाठी या औषधाचा नाकाद्वारे वापर केला जातो. या औषधांमुळे सर्दी आणि फ्लूच्या व्हायरला अटकाव होत असल्याचे संशोधनातून दिसून आले आहे. तसेच या औषधांचा वापर केल्यास संक्रमणाचा धोकाही कमी होत असल्याचे दिसून आले आहे. हे संशोधन फ्लूचे विशेतज्ज्ञ प्रोफेसर रॉन अक्लेस यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे. तसेच स्वानसी युनिव्हर्सिटीचे मुख्य संशोधक इयान व्हिटेकर, आरोग्य आणि शल्यचिकित्सक तज्ज्ञ प्रोफेसर लेले हचिंग्स यांचा पथकात सहभाग आहे. त्यामुळे या औषधांच्या चाचण्यांचे सकारात्मक परिणाम आल्यास कोरोनालसीसह पर्यायी आणि पूरक औषधही उपलब्ध होणार आहे.

 

आपली प्रतिक्रिया द्या