बोरिवलीतील आदिवासींना आरे कॉलनीत घरे देणार

15

सामना ऑनलाईन । नागपूर

गरीबांना घरे मिळाली पाहिजेत हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न होते. हे स्वप्न पूर्ण करण्याच्या दृष्टीने पावले उचलली जात आहेत. बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील आदिवासी पाडे आणि अधिकृत झोपडपट्टीतील रहिवाशांसाठी आरे कॉलनीचा नव्याने करण्यात आलेल्या विकास आराखडय़ातील ठरावीक क्षेत्र घेऊन त्यांच्या घरांची व्यवस्था करण्यात येईल. तसेच अपात्र झोपडपट्टीधारकांना पंतप्रधान निवास योजनेसाठी पात्र ठरवून त्यांनाही घरे दिले जातील, अशी माहिती गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी विधान परिषदेत दिली.

बोरिवलीतील आदिवासी पाडे आणि झोपडपट्टीधारकांना घरे मिळावीत यासंदर्भात सदस्य डॉ. नीलम गोऱ्हे, ऍड. अनिल परब, प्रवीण दरेकर, भाई गिरकर आदी सदस्यांनी अल्पकालीन चर्चा उपस्थित केली. याविषयी बोलताना ऍड. अनिल परब म्हणाले की, बोरिवलीतील २४ हजार झोपडपट्टीधारकांना कोणत्याच मूलभूत सोयीसुविधा मिळत नाहीत. त्यांच्यासाठी योजना राबविल्या जात असल्या तरी त्यांच्यापर्यंत त्या पोहचत नाही. अत्यंत वाईट अवस्थेत राहत असून त्यांचे पुनर्वसन करणार का? असा सवाल त्यांनी केला. फ्लाइंग झोनमुळे हजारो बांधकामे रखडली असून त्यावर तोडगा काढणे आवश्यक आहे. अनेक इमारती या पुनर्विकासासाठी आल्या आहेत. त्यांच्याकरिता धोरण ठरवावे लागेल. सदस्य रवींद्र फाटक यांनी ठाणे जिह्यातील डहाणू, पालघरमधील आदिवासी पाडय़ांचा विकास करावा अशी मागणी केली.

डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आदिवासी झोपडपट्टीधारकांकडून वन विभागाने घरे देण्यासाठी सात हजार रुपये वसूल केले आहेत. सरकारने यासंदर्भात धोरणात्मक निर्णय जाहीर करावा. आदिवासींना घरे मिळाली पाहिजेत. त्याचबरोबर म्हाडाच्या बांधकामाचा दर्जा खालावल्यामुळे बांधकामे निकृष्ट दर्जाचे होत असल्याचे गोऱ्हे यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या