आकर्षक चित्रांनी सजल्या २५ शाळा! आदिवासी मुलांमध्ये अभ्यासाची गोडी वाढली

355

हलाखीच्या परिस्थितीमुळे शिक्षण घेण्यासाठी मोठी धडपड करावी लागलेल्या आदिवासी पेठ तालुक्यातील योगिराज भांगरे या युवा चित्रकाराने आपल्या कलेच्या माध्यमातून नाशिक जिल्ह्यासह जव्हारच्या आदिवासी भागातील पंचवीसहून अधिक शाळा व अंगणवाड्या आकर्षक चित्रांनी सजवल्या आहेत. या शाळांचे आकर्षक रूप सर्वांनाच भुरळ घालणारे ठरत आहे. भिंतींवरील फळे, भाज्या, पक्षी, प्राण्यांच्या चित्ररूप माहितीमुळे लहान मुलांमध्ये अभ्यासाची गोडी वाढली आहे.

पेठ तालुक्यातील आडगाव भुवन येथील योगिराज भाऊराव भांगरे याला चित्रकलेचे शिक्षण घ्यायचे स्वप्न होते. गरिबीमुळे घरातून मदत मिळणे शक्य नसल्याने मित्रांकडून उसने पैसे घेत त्याने येवला येथील महाविद्यालयातून एटीडीचे शिक्षण पूर्ण केले. सहा वर्षांपूर्वी गावी परतल्यानंतर त्याला प्रथम एका शिक्षकाने गावातीलच शाळेच्या भिंतींवर पक्षी, प्राणी काढण्याचे काम दिले आणि आज हाच त्याचा व्यवसाय झाला असून आता हाताखाली काही काम देत तो दोन-तीन तरुणांना रोजगार पुरवत आहे. तो शाळेच्या भिंती रंगवणे, आत व बाहेर प्राणी, पक्षी, निसर्गचित्रे काढत असल्याने या शाळांचे रूप खुलून आले आहे. लहान मुलांच्या वर्गात लिहिणारे, वाचन करणारे कार्टून, फळे, भाज्या, पक्षी व प्राणी यांची चित्रे काढण्यावर तो भर देतो. मोठ्या वर्गातील मुलांसाठी सुविचार, शिक्षकांनी सांगितल्याप्रमाणे तत्तेâ व इतर महत्त्वाचे लेखन करून देत आहे. लॉकडाऊनच्या काळात कुठलेच काम नव्हते. जूनमध्ये पिंपळवटी येथील शाळेचे काम मिळाले, ते नुकतेच पूर्ण झाले आहे. आता पावसाळ्यामुळे गाळमाळ येथील कामात खंड पडला आहे, असे त्याने सांगितले.

आदिवासी भागातील ग्रामपंचायतींचाही पुढाकार
नाशिक जिल्ह्यातील आडगाव भुवन, तोरंगण, पिंपळवटी, रामशेज, दरी-मातोरी, मोहपाडा, खडकी, बिलकस, धोंडमाळ, जव्हार-मोखाडा भागातील दूधगाव, खरपडी अशा पंचवीसहून अधिक गावांमधील जिल्हा परिषदेच्या शाळा व अंगणवाड्या योगिराजने काढलेल्या चित्रांनी सजल्या आहेत. आता आदिवासी भागातील ग्रामपंचायतीदेखील तेथील शाळांमध्ये चित्रे काढून घेण्यासाठी पुढे येऊ लागल्या आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या