आदिम लोक परंपरा

106

 

डॉ. गणेश चंदनशिवे

दिवासी समाजाची परंपरा निसर्गातील दुष्ट शक्ती आणि मृतात्मे यांच्यावर अवलंबून आहे, असा त्यांचा दृढ समज आहे. कुठलेही धार्मिक कार्य करताना आदिवासी जमातीतील लोक भगत, देवऋषी यांचा सल्ला घेत असतात. अलौकिक पातळीवरील शक्तीवर आदिवासी समाजाचा पुरेपूर विश्वास असतो. त्यांचे जग हे देवदेवतांच्या आणि भूतप्रेतांच्या विचारांनी भारलेले असते. आदिवासी समाजाने दोन क्षेत्रे आरक्षित केलेली आहेत. एक म्हणजे आकाश क्षेत्र आणि दुसरे म्हणजे भूमी क्षेत्र. या दोन्हीही क्षेत्रांवर आदिवासींचे स्थळ अवलंबून असते. निसर्गातील परिवर्तने, स्थित्यंतरे यावर घडणाNया बाबींवर आदिवासींच्या काळाची गणना केली जाते. चंद्र-सूर्याचे भ्रमण होणे, पाने, फुले, वेलींचे उमलणे अमावस्या-पौर्णिमेला निश्चित होतात.

महाराष्ट्रातील विविध जमातींची विधी विधाने वेगवेगळ्या स्वरूपात पाहावयास मिळतात. असे असूनसुद्धा त्यांची नियमावली, ध्वनी, संकेत आणि मंत्रोच्चारण यामध्ये समानता आढळते. आदिवासींची आदिम परंपरा आणि धार्मिक विधीमध्ये तसेच प्राधान्याने जादूक्रियेत मंत्राचा उपयोग मोठ्या प्रमाणात आढळतो. आदिवासींचे मंत्रोच्चारण भेदिकासारखे कूट भाषेत असते. त्यामुळे त्यातील गुप्त गोष्टींबद्दल गोपनीयता आढळते. वाद्यांतून निघणारे ध्वनी हे मंगल आणि अमंगल स्वरूपाचे असतात.

आदिवासींच्या लोककला आणि लोकपरंपरा या धार्मिक विधींशी निगडित असतात. आनंददायी प्रसंगामध्ये वारली चित्रकला त्यांच्या घरासमोर रंगविलेली आपणास दिसते. आदिवासींचा मूळ व्यवसाय शेती असल्याने शेतीची अवजारे, सूर्य, चंद्र, तारे, वेली, पुâले शेणमातीने भिंत सारवून त्यावर रेखाटली जातात. चित्रकलेप्रमाणे आदिवासींची लोकनृत्य सुद्धा आकर्षक असतात. त्यात गीत, नृत्य, नाट्य ओतप्रोत भरलेले असते. पंचमीच्या वेळेला बोहाडा, पंचमीची मुखवटेधारी सोंगे काढली जातात. स्त्रिया आणि पुरुष विविध प्रकारची नृत्ये करताना दिसतात. घेरनाच, ढेमसा, धेडगा, घुसाडी, पावरा, शिमगा इत्यादी लोकनृत्यांचे विविध प्रकार आपणांस आढळतात. स्त्रिया प्रामुख्याने गोफ, झिम्मा, कोंबडा, पिंगा इत्यादी नृत्य पायात पाय अडकवून कमरेत किंवा गळ्यात हात घालून नृत्यं सादर करतात. वेताच्या काठीला घुंगरू बांधून तालासाठी उपयोग करतात. स्त्रियांच्या नृत्याप्रमाणे पुरुषांचे नृत्यही आकर्षक आणि लवचीक असतात. कसरतीचे खेळ, लेझीम, गोफ, टिपरी, ढोलनाच करीत असतात. ही नृत्ये करीत असताना कधी ठेक्यावर बैठका घेणे, तर कधी उलट्यासुलट्या गिरक्या घेणे, पौर्णिमेच्या चंद्र्रप्रकाशात आदिवासींची नृत्ये अधिक आकर्षित दिसतात. त्यात प्रचंड प्रमाणात ऊर्जा जाणवते. उत्सव, महोत्सवाच्या काळात ढोल, डफडे, लाकडाच्या चिपळ्या इत्यादी वाद्यांच्या तालावर काबळ नाच, ढोलनाच, तंबोरीचा नाच केला जातो. ठाकर गौंड, भिल्ल, कातकरी, कोरकू या जमातींतील लोक काही प्रमाणात तारफासारख्या वाद्यावर नाचताना आढळतात.

लोकवाद्य, लोकसंगीत, लोकनृत्य आणि लोककथा हे आदिवासी समाजाच्या जीवनाचे अविभाज्य अंग आहे. आज जागतिकीकरणाच्या युगात आदिवासी ग्रामसंस्कृतीकडून शहरीकरणाकडे आकर्षित होत चाललेला आहे. ज्या जंगलाच्या जिवावर तो आपली उपजीविका भागवायचा तेच जंगल उद्ध्वस्त होत चाललेले आहे. प्रचंड प्रमाणात वृक्षतोड आणि जंगलतोड झाल्यामुळे आदिवासी जीवन उजाड आणि ओसाड पडत चाललेले आहे. आदिवासींवर उपासमारी, कुपोषण, भूकबळी इत्यादी समस्यांचा भस्मासुर आक्रमण करीत आहे. निसर्ग ही समाजजीवनाची खूप मोठी संपत्ती आहे. तिचे जतन, संवर्धन करणे हेच आपले मूळ उद्दिष्ट असावे, जेणेकरून मूळ निवासी असणारे आदिवासी आपली संस्कृती पुढच्या पिढीकडे घेऊन जातील हीच अपेक्षा.

 

आपली प्रतिक्रिया द्या