मुंबई व महाराष्ट्र पोलिसांना ‘वंदे मातरम’ व्हिडीओद्वारे मानाचा मुजरा

‘कोविड’ या अनपेक्षित आणि अभूतपूर्व अशा जागतिक महामारीच्या दिवसांमध्ये प्रत्येकजण आपापल्यापरीने सामाजिक जाणीव व्यक्त करत इतरांना मदत करत आहे. या महासंकटाच्या काळात ज्यांना ‘कोविड योद्धे’ म्हटले जाते ते पोलीस, डॉक्टर, वैद्यकीय सेवक यांचे योगदान मोठे आहे. हे सर्व स्वतःच्या जीविताला असलेला धोका पत्करून आपल्यासाठी व आपल्या सुरक्षिततेसाठी काम करत आहेत. अशा परिस्थितीत त्यांचे मनोबल वाढावे व त्यांना मनाचा मुजरा करावा म्हणून निर्माते आणि परसेप्ट लिमिटेडचे संस्थापक, बॉस एन्टरटेन्मेंटची सुरुवात करणारे शैलेंद्र सिंग आणि उद्योगपती ऋषी सेठिया यांनी एकत्र येऊन एक मानवंदना लघुपट निर्माण केला आहे. प्रख्यात संगीतकार सलील कुलकर्णी यांनी तो संगीतबद्ध केला असून आघाडीची पार्श्वगायिका आर्या आंबेकर हिने त्यातील ‘वंदे मातरम’ गीत गायले आहे.

हा दोन मिनिटांचा व्हीडिओ म्हणजे महाराष्ट्र आणि मुंबई पोलिसांच्या शौर्याला मानवंदना असून त्यात मुंबईतील पोलिसांचे विविध मूड आणि सेवेतील क्षण टिपले गेले असून त्या ज्या कठीण व आव्हानात्मक परिस्थितीत सेवा बजावत आहेत, त्याचे चित्रण आहे. ‘वंदे मातरम’च्या धुनीवर हा व्हिडीओ चित्रित झाला असून त्याचे संगीत संयोजन प्रख्यात संगीतकार, गायक व कवी सलील कुलकर्णी यांनी अत्यंत संवेदनशीलतेने केले आहे. ‘सारेगामा मराठी लिटल चॅम्पस्’ गाजवलेली आजची आघाडीची पार्श्वगायिका आर्या आंबेकर हिच्या आवाजामुळे या मानवंदना चीत्राफितीला एक वेगळे आयाम प्राप्त झाले आहे. या चित्रफितीचे संकलन मनन कोठारी यांनी केले आहे.

पाहा व्हिडीओ-

आपली प्रतिक्रिया द्या