सुप्रिमो चषक-ट्रायडंट उमर इलेव्हनची उपांत्य फेरीत धडक

19

सामना ऑनलाईन,मुंबई

हिंदुस्थानातील टेनिस क्रिकेटमधील नंबर वन स्पर्धा म्हणून ओळखल्या जाणाऱया सुप्रिमो चषक या मानाच्या स्पर्धेच्या सातव्या मोसमाला बुधवारी मोठय़ा जल्लोषात सुरुवात झाली. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन झाल्यानंतर सर्वार्थाने या स्पर्धेचा श्रीगणेशा झाला. ट्रायडंट उमर इलेव्हन संघाने सुरुवातीला दहिसर बॉईज व त्यानंतर वैष्णवी कोलाड इलेव्हन या संघाला पराभूत करत खुल्या गटाच्या उपांत्य फेरीत अगदी रुबाबात धडक मारली. यंदा सुरू असलेल्या सुप्रिमो चषक या स्पर्धेच्या सेमी फायनलमध्ये धडक मारणारा हा पहिलाच संघ ठरलाय हे विशेष. शिवसेनेचे विभागप्रमुख-आमदार संजय पोतनीस व शिवसेनेचे विभागप्रमुख-आमदार ऍड. अनिल परब यांच्या पुढाकारामुळे ही स्पर्धा यशस्वीरीत्या आयोजित केली जात आहे. शिवसेना व राजेंद्र स्पोर्टस् हे या स्पर्धेचे आयोजक आहेत हे विशेष.

एकता इलेव्हन गुजरातचा पराभव
वैष्णवी कोलाड रायगड व एकता इलेव्हन गुजरात यांच्यामधील लढतीत एकता इलेव्हन गुजरातला पराभवाचा सामना करावा लागला. योगेश पवारच्या २८ धावा व आकाश तारेकरच्या २४ धावा वैष्णवी कोलाड रायगडच्या विजयाचे वैशिष्टय़ ठरल्या. दोघांच्या फटकेबाजीमुळे संघाने ७५ धावांचा पाठलाग ७ षटकांमध्येच केला.

उपांत्यपूर्व सामन्यात नवी मुंबईच्या संघाची बाजी
ट्रायडंट उमर इलेव्हन व वैष्णवी कोलाड रायगड यांच्यामध्ये झालेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत नवी मुंबईच्या ट्रायडंट उमर इलेव्हन संघाने वैष्णवी कोलाड रायगड संघावर १७ धावांनी दमदार विजय मिळवत घोडदौड केली. रवी लिंगालाने १४ चेंडूंत ३० धावांची तर उस्मान पटेलने १४ धावांची ताबडतोब खेळी साकारत ट्रायडंट उमर इलेव्हनला ९६ धावा उभारून दिल्या. वैष्णवी कोलाड रायगड संघाला ८ षटकांत ७ बाद ७९ धावाच करता आल्या.

समालोचक, स्कोअरर सुसाट
सुप्रिमो चषकाचे धावते समालोचन दोन अनुभवी व्यक्ती करताहेत. बालसुब्रमण्यम अय्यर व हरीश पंडया. या दोन्ही व्यक्ती आपल्या भन्नाट समालोचनाने या स्पर्धेला आणखीनच चार चाँद लावत आहेत. एवढेच नव्हे तर प्रसाद रानडे व संजय म्हात्रे हे स्कोअरर डोळ्यांमध्ये तेल घालून लढतीच्या आकडेवारींवर बारीक लक्ष ठेवून आहेत.

पाच धावांनी रोमहर्षक विजय
ट्रायडंट उमर इलेव्हन व दहिसर बॉईज यांच्यामध्ये सलामीची लढत रंगली. दोन संघांमधील ही लढत पाहण्यासाठी तब्बल २० हजार क्रिकेटप्रेमींनी सांताप्रुझमधील एअर इंडिया स्टेडियम गाठले होते. प्रथम फलंदाजी करणाऱया ट्रायडंट उमर इलेव्हन संघाने ८ षटकांत ६६ धावा केल्या. उस्मान पटेलने १५ तर उमर खानने १६ धावा करीत संघाच्या धावसंख्येत मोलाची भर घातली. बिपीन झटाकियाने ३ बळी गारद केले. ६७ धावांचा पाठलाग करणाऱया दहिसर बॉईज संघाने ६१ धावांपर्यंत मजल मारली. थॉमस डाएसच्या २९ धावा विजयासाठी पुरेशा ठरल्या नाहीत.

सामनावीर ः

बिपीन झटाकिया

आपली प्रतिक्रिया द्या