आफ्रिकन कर्णधाराने खराब कामगिरीचे खापर ‘आयपीएल’वर फोडले, म्हणाला…

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

आयसीसी क्रिकेट वर्ल्डकप स्पर्धा 2019 मध्ये दक्षिण आफ्रिकेच्या संघाची खराब कामगिरी पाकिस्तानविरुद्धच्या लढतीतही दिसून आली. रविवारी झालेल्या लढतीत पाकिस्तानने आफ्रिकेचा 49 धावांनी पराभव केला. वर्ल्डकपमध्ये आतापर्यंत आफ्रिकेने फक्त दुबळ्या अफगाणिस्तानवर विजय मिळवला आहे. आफ्रिकेचा संघ वर्ल्डकपमधून जवळपास बाहेर गेला आहे. वर्ल्डकपमधील खराब कामगिरीबाबत आफ्रिकन कर्णधार फाफ डू प्लेसिसने आयपीएलला जबाबदार धरले आहे.

आदर्श खेळाडूकडून थोडे तरी शिक, शोएबचा बाबर आझमला ‘विराट’ सल्ला

पाकिस्तानविरुद्धचा पराभव जिव्हारी लागल्यानंतर आफ्रिकेचा कर्णधार फाफ डू प्लेसिस म्हणाला की, आयपीएलच्या व्यस्त कार्यक्रमामुळे खेळाडूंना आराम मिळाला नाही. त्यामुळेच आमचा संघ वर्ल्डकपमध्ये चांगली कामगिरी करू शकला नाही. आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जचे प्रतिनिधित्व करणारा डू प्लेसिसने दक्षिण आफ्रिकेचा प्रमुख वेगवान गोलंदाज रबाडाच्या खराब प्रदर्शनाला देखील आयपीएलला जबाबदार धरले आहे.

संघ व्यवस्थापकाने रबाडाला आयपीएलच्या व्यस्त कार्यक्रमापासून स्वत:ला दूर ठेवण्यास सांगितले होते. त्यांनी रबाडावर आयपीएल न खेळण्यासाठी दबावही टाकला होता, परंतु तसे होऊ शकले नाही. हेच एक कारण आहे की आमचा प्रमुख गोलंदाज वर्ल्डकपमध्ये चांगली कामगिरी करू शकला नाही. रबाडाला आयपीएलमध्ये विश्रांती मिळाली असती तर आमच्या संघाला हा दिवस पाहण्याची वेळ आली नसती, असेही फाफ डू प्लेसिस म्हणाला.