झोपला तो जिंकला! झोपून जिंकलं 6 लाखांचं बक्षिस, पश्चिम बंगालच्या तरुणीचा अनोखा विक्रम

दिवसभर झोपा काढत असतोस! गाढवासारखा लोळत काय पडलायस!! असे टोमणे ऐकावे लागणाऱ्या तरुण-तरुणींसाठी ही महत्वाची बातमी आहे. झोपूनही पैसे मिळू शकतात हे पश्चिम बंगालमधल्या तरुणीने सिद्ध करून दाखवलंय. या तरुणीने छान झोपून 6 लाख रुपये बक्षिसाची रक्कम म्हणून मिळवले आहेत. त्रिपर्णा चक्रवर्ती असं या तरुणीचं नाव असून हुगळीतील श्रीरामपूरमध्ये राहणाऱ्या या तरुणीला ‘छान झोपणारी व्यक्ती’ असा सन्मान देण्यात आला आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आलेल्या देशभरातील साडेचार लाख इच्छुकांना मागे टाकत त्रिपर्णाने हा किताब पटाकवला आहे.

या स्पर्धेसाठी 4.5 लाख अर्ज दाखल झाले होते ज्यातील 15 स्पर्धकांची निवड करण्यात आली होती. यातल्या 4 जणांची अंतिम फेरीसाठी निवड झाली होती. ऑनलाईन वेबसाईटद्वारे त्रिपर्णाला झोपण्याची एक देशपातळीवरील स्पर्धा आयोजित केली जात असल्याचं कळालं होतं. तिने सहज म्हणून या स्पर्धेत भाग घेण्यासाठी अर्ज केला होता. अंतिम फेरीतील इतर तिघांना मागे टाकत त्रिपर्णाने अंतिम विजेत्याचा पुरस्कार मिळवला. अंतिम फेरीतील स्पर्धकांना झोपण्यासाठी एक मॅट्रेस आणि तुम्ही किती तास सलग झोपता हे तपासण्यासाठी स्लीप ट्रॅकर दिला होता. त्रिपर्णाने या स्पर्धेत सलग 100 दिवस 9 तास झोपून दाखवत आपला विजय निश्चित केला. अंतिम फेरीची विजेता ठरल्याने त्रिपर्णाला 1 लाखांचे 6 चेक देण्यात आले आहेत.

त्रिपर्णाने म्हटलंय की तिला लहानपणापासून झोपायची आवड होती. परीक्षा देताना किंवा इंटरव्ह्यूसाठी गेली असतानाही आपण झोपलो होतो असं तिने म्हटलंय. त्रिपर्णा एका बहुराष्ट्रीय कंपनीत कामाला असून तिच्या कामाच्या वेळा या रात्री सुरू होतात. यामुळे तिच्या झोपेवर परिणाम होत असून, मी झोप भरून काढण्यासाठी दिवसा झोपते असं तिने सांगितलंय.