प्रकाशकिरणांचे स्वागत!

36

तिहेरी तलाकप्रथेबाबत सहा महिन्यांत कायदा करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. तोपर्यंत या प्रथेवर बंदी घालण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. राष्ट्र समाजाला नवी चेतना देणारा हा निर्णय आहे. ‘आमच्या कायद्यांमध्ये कुणीही हस्तक्षेप करू शकत नाहीया अरेरावी भूमिकेतून आता तरी इमाम, मुल्ला, मौलवींनी बाहेर पडायला हवे. तिहेरी तलाकच्या निर्णयाने नवी प्रकाशकिरणे उगवली आहेत. मुस्लिम समाजाने आता दारेखिडक्या बंद करून या प्रकाशकिरणांचा अपमान करू नये!

अखेर तिहेरी ‘तलाक’ पद्धतीचा फैसला सर्वोच्च न्यायालयाने आज दिला. इस्लामच्या नावाखाली सुरू असलेल्या एका अमानुष प्रथेला आता तरी पूर्णविराम मिळेल, असे मानायला हरकत नाही. आता राज्य काँग्रेसचे नसून नरेंद्र मोदींचे आहे. त्यामुळे ‘शाहबानो’ प्रकरणात जो घोळ तेव्हाच्या काँग्रेस राज्यकर्त्यांनी घातला तसा प्रकार आता होणार नाही. हिंदुस्थानातील लाखो मुसलमान महिलांना या निर्णयामुळे खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य मिळाले आहे. मुस्लिम समाजातील महिलांसाठी अत्याचार ठरलेल्या ‘तिहेरी तलाक’ प्रथेबाबत सहा महिन्यांत कायदा करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. तोपर्यंत या प्रथेवर बंदी घालण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. राष्ट्र व समाजाला नवी चेतना देणारा हा निर्णय आहे. परिवर्तन खऱ्या अर्थाने सुरू झाल्याची ही पावती आहे. मुस्लिम समाजातील महिला व समाजधुरिणांनी या निर्णयाचे स्वागत करायलाच हवे. किंबहुना देशातील अनेक मुस्लिम महिलांनी या निर्णयाचे स्वागतही केले आहे. ही न्यायालयीन लढाई न डगमगता लढणाऱ्या आणि जिंकणाऱ्या शायरा बानो यांनीही समाधान व्यक्त करतानाच आता तिहेरी तलाकविरोधातील कायदा लवकरात लवकर व्हावा अशी मागणी केली आहे. शायरा बानो यांची अपेक्षा लवकर पूर्ण होईल आणि हिंदुस्थानी मुस्लिम महिलांसाठी निदान एका अमानुष प्रथेपुरता का होईना ‘मुक्ती दिन’ उजाडेल अशी अपेक्षा आहे. अर्थात या मधल्या काळात धर्मांध मुस्लिम नेते, मुल्ला-मौलवी आणि मतांसाठी त्यांच्यापुढे लाचार होणारे भंपक ‘सेक्युलर’ राजकारणी विरोधाचे निशाण फडकविण्याचा प्रयत्न करणारच. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे ‘इस्लाम खतरें में’ आल्याची बांगदेखील पुन्हा एकदा ठोकली जाईल. पण हेच लोक मुस्लिम समाजाचे खऱ्या अर्थाने शत्रू आहेत. अन्याय, अत्याचार व पीडेचे ओझे महिलांच्या पाठीवर लादून त्यांना गुलाम करा, असे कुराणात सांगितले नाही. मुस्लिमांचा स्वतंत्र कायदा ही आता अंधश्रद्धा मानायला हवी व ‘आमच्या कायद्यांमध्ये कुणीही हस्तक्षेप करू शकत नाही’ या अरेरावी भूमिकेतून आता तरी इमाम, मुल्ला, मौलवींनी बाहेर पडायला हवे. सध्याच्या संसदेत चांगले लोक नाहीत व ही संसद मुस्लिमांचे भले करू शकत नाही, असे मत मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाच्या मेंबरांनी व्यक्त केले आहे. तिहेरी तलाकची प्रथा योग्यच आहे आणि ती कुणालाही बदलता येणार नाही, असेही मत त्यांनी व्यक्त केले. हा सरळसरळ संसदेचा हक्कभंग आहे. तिहेरी तलाकच्या निर्णयाने नवी प्रकाशकिरणे उगवली आहेत. मुस्लिम समाजाने आता दारे-खिडक्या बंद करून या प्रकाशकिरणांचा अपमान करू नये!

पनवेली भोपळ्याचे श्राद्ध!

पनवेलनंतर मीरा-भाईंदर महानगरपालिका निवडणुकांचा निकाल अपेक्षेप्रमाणेच लागला आहे. पनवेलात शिवसेनेच्या हाती भोपळा लागला असे बोलणाऱ्यांना आम्हाला इतकेच सांगायचे आहे की, बाबांनो उतू नका, मातू नका. अर्थात या ऊतमात करणाऱ्यांच्या हाती कोणताही वसा नसल्याने घेतला वसा सोडू नका असे बजावण्यातही अर्थ नाही. पनवेलचे रेतीसम्राट अब्जोपती ठेकेदार दत्तक घेतले नसते तर तुमच्या हाती ‘लिंबू’ही लागले नसते व सुकलेली लिंबे चोळत बसण्याची वेळ तुमच्यावर आली असती. दुसरे असे की, भोपळ्याची आठवण करून दिलीच आहे म्हणून सांगायचे. आम्ही अंधश्रद्धा, रूढी-परंपरा पाळत नसलो तरी भोपळ्याची भाजी ही ‘श्राद्ध’ वगैरे समयी विशेष करून पितरांसाठी केली जाते. त्यामुळे शिवसेनेच्या हाती लागलेला भोपळा हा संकेत समजावा. हा भोपळाच उतणाऱ्या-मातणाऱ्यांचे श्राद्ध घातल्याशिवाय राहणार नाही. राहता राहिला विषय मीरा-भाईंदर निवडणुकांचा. येथे कमळाबाईंवर मतांची दौलतजादा झाली व ‘६१-६२’ जागा जिंकून भाजप बहुमताने सत्ताधीश झाला. शिवसेना दुसऱ्या क्रमांकावर म्हणजे २२ जागा जिंकून मागे पडली तरी त्याची खंत वाटण्याचे कारण नाही. मीरा-भाईंदरचे निकाल हे धक्कादायक वगैरे नाहीत. येथे सरळ जातीयवादी प्रचार झाला. धर्मगुरू हा कोणत्याही धर्माचा असो. संयम आणि शांततेचा संदेश हीच त्याची भूमिका असायला हवी, पण मीरा-भाईंदरच्या निवडणूक प्रचारात जैन धर्मीयांचे ‘मुनी’ उतरले व त्यांनी ज्या भाषेत भारतीय जनता पक्षाचा प्रचार केला. ती भाषा व कृती एखाद्या जैन मुनीस शोभणारी नाही. मोह, माया, मत्सरापासून लांब राहण्याचे सोडून सरळ चौकाचौकात प्रचार सभा घेणे हे कोणते राजकारण? या निवडणुकीत एखाद्या धर्मगुरूनेच जातीय विष पेरण्याचा प्रयत्न केला असेल तर त्याच्यावर आधी कायद्याने कठोर कारवाई होणे गरजेचे आहे. जामा मशिदीच्या इमामाप्रमाणे इतर धर्मगुरू वागू लागले तर हा देश अस्थिर व अस्वस्थ झाल्याशिवाय राहणार नाही. मीरा-भाईंदरमधील ‘मराठी’ टक्का हा शिवसेनेबरोबर राहिला, पण मुंबईप्रमाणेच इतर जात-प्रांतवाले महाराष्ट्रात राहून जातीय प्रचारात ओंडक्याप्रमाणे वाहून गेले. त्यामुळे पनवेलातील भोपळा आता जातीय उन्माद करणाऱ्यांचे श्राद्ध घातल्याशिवाय राहणार नाही. आम्ही संयमी आहोत याचा अर्थ आमचा धृतराष्ट्र झालेला नाही!

आपली प्रतिक्रिया द्या