अंधेरीच्या त्रिवेणी महिला मंडळाचे सामाजिक ध्येय

>> अनघा सावंत 

वृद्धत्वाकडे वाटचाल करताना ‘जीवनगाणे गातच रहावे’ या ओळीप्रमाणे प्रत्येक क्षण आनंदाने अनुभवत सामाजिक दायित्वही जपणे याचे उत्तम उदाहरण म्हणजे अंधेरीचे त्रिवेणी महिला मंडळ. या मंडळाला या वर्षी 57 वर्षे पूर्ण होत असून महिला मंडळाच्या बहुतेक सभासद या ज्येष्ठ नागरिक आहेत. महिलांना वय विसरायला लावून त्यांच्यातील ऊर्जेला बळ देण्याचे आणि त्यांना सतत उत्साही, कार्यरत आणि संघटित ङ्खsवून आत्मविश्वास देण्याचे मोलाचे कार्य मंडळ करते. यासाङ्गी मनोरंजनाचे विविध कार्यक्रम करतानाच तेवढय़ाच जबाबदारीने विविध सामाजिक उपक्रमही मंडळ सातत्याने राबविते.

1966 साली अंधेरी पश्चिम उपनगरात त्रिवेणी महिला मंडळाची स्थापना झाली. त्या वेळी या विभागात महिलांसाङ्गी अशी कोणतीही संस्था नाही हे लक्षात आल्यावर नलिनी पाटील यांनी आपल्या काही मैत्रिणींना घेऊन हे महिला मंडळ सुरू केले. मंडळाला स्वतःची जागा घेणे शक्य नसल्यामुळे त्यांनी स्वतःच्या ‘साऊली’ या बंगल्यातच मंडळाचा श्रीगणेशा केला. तेव्हापासून ते 2020 सालापर्यंत म्हणजे 54 वर्षे मंडळाचे कार्य या ङ्गिकाणीच चालू राहिले. यानंतर कोरोनामुळे दोन वर्षांचा खंड पडला असला तरी आता पुन्हा भाडय़ाने नवीन जागा घेऊन त्रिवेणी महिला मंडळाची वाटचाल नव्या जोमाने सुरू झाली आहे.

 मंडळात सभासद भगिनींच्या कलागुणांना आणि कौशल्याला वाव देणारे कार्यक्रम सातत्याने होतात. प्रत्येक भगिनीचा त्यात उत्स्फूर्त सहभाग असतो. मंडळाच्या सदस्या सुषमा म्हात्रे यांची मंडळाच्या प्रत्येक कार्यात नेहमीच मोलाची मदत असते, अशी भावना मंडळाच्या कार्याध्यक्षा आशा कामतेकर यांनी व्यक्त केली.

 अनेक वृद्धाश्रमांना मंडळ मदतीचा हात देते. गरजू  विद्यार्थ्यांना फी, गणवेश, वह्या-पुस्तके देण्यासाङ्गी मंडळ स्वतः शाळेकडे जाऊन मदतीचा हात देते. स्वतःचे, मुलांचे वाढदिवस अथवा एखाद्या सणाच्या निमित्ताने कर्करोगग्रस्त, मूकबधिर, अनाथ, ज्येष्ठांना मदत केली जाते.

 मंडळाच्या साध्या, सामान्य गृहिणी असलेल्या सभासद स्वतः पुढाकार घेऊन नाटय़ाभिनय, लेखनकार्य, चित्रकला, वत्तृत्व, पुस्तक परीक्षण, पाककला, योगाभ्यास, पर्यटन व्यवस्थापन, दूरचित्रवाणीवर सहभाग अशा विविध क्षेत्रांत स्वतःच्या उत्कृष्ट कामगिरीने चमकत आहेत. बाहेरील स्पर्धांमध्येही भाग घेतात.

 मंडळामध्ये भगिनींच्या बुद्धीला, विचारांना, कलेला, शारीरिक क्षमतेला चालना देणाऱया विविध स्पर्धा आयोजित केल्या जातात. सहली, स्नेहभोजन, संस्कृती, परंपरा जपणारे सण, समारंभ साजरे करणे अशा सर्व उपक्रमांमुळे या वयातही खेळांचा आनंद घेण्याची संधी महिलांना मिळते.