ट्रक अपघातात संपूर्ण कुटुंबाचा मृत्यू, ५ वर्षीय मुलगा आश्चर्यकारकरित्या बचावला

29

सामना प्रतिनिधी । नळदुर्ग

तुळजापूर तालुक्यातील नंदगावजवळ ऊस घेवून जाणाऱ्या ट्रकचा अपघात होऊन ३ जण ठार तर १० कामगार जखमी झाले आहेत. मृतांमध्ये ऊसतोड कामगार पती, पत्नी व मुलगा यांचा समावेश असून हे कुटूंब तुळजापूर तालुक्यातील रामतीर्थ तांडा येथील आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, तुळजापूर तालुक्यात विविध साखर कारखान्याकडून ऊसतोड सुरू आहे. रविवार नंदगाव येथील ऊस तोडून गोकूळ शुगर कारखान्याकडे ऊसाची वाहतूक करणारा मालट्रक (एमएच २५/ ८४५७) नंदगाव जवळ पटली झाला. या अपघातामध्ये ऊसतोड करणारे मजूर राजेंद्र मिठू राठोड (३०) त्यांची पत्नी ललिता राजेंद्र राठोड (२८) व त्यांचा आठ वर्षाचा मुलगा स्वप्नील राजेंद्र राठोड हे जागीच ठार झाले. इतर १० गंभीर जखमी झाले आहेत. जखमींमध्ये गोविंद भिल्लू पवार, धोंडिराम भिल्लू पवार, पारुबाई धोंडिराम पवार, इंदूाबाई गोविंद पवार यांचा समावेश असून या सर्वांना उपचारासाठी सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. या अपघातामध्ये मयत राजेंद्र राठोड व ललिता राठोड यांचा ५ वर्षाचा मुलगा कार्तिक हा आश्चर्यकारकरित्या बचावला आहे.

अपघाताचे वृत्त समजताच नळदुर्ग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रल्हाद सुर्यवंशी हे पोलीस कर्मचाऱ्यासह घटनास्थळी दाखल झाले.

आपली प्रतिक्रिया द्या