बीड – मद्यधुंद ट्रक चालकाने अ‍ॅपे आणि मोटारसायकलस्वारास उडवले, पाच जण ठार झाल्याची भीती

बीड-परळी रोडवर बीड शहरापासून अवघ्या चार कि.मी.अंतरावर असलेल्या पांगरबावडीनजिक भरधाव आणि मद्यधुंद अवस्थेत असलेल्या ट्रकचालकाने प्रवासी वाहतूक करणाऱ्या अ‍ॅपेरिक्षाला उडवल्याची घटना रविवारी सायंकाळी सव्वासातच्या सुमारास घडली.

या अपघातामध्ये अ‍ॅपेरिक्षातील पाच जणांचा बळी गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे. याच भरधाव ट्रकने पुढे राजुरीजवळ समोरून येणाऱ्या दुचाकीस्वारास उडवले आहे. उडवल्यानंतर ट्रक पलटी झाला आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. घटनास्थळी रूग्णवाहिका आणि पोलीस दाखल झाले आहेत.

बीडहून भरधाव निघालेला ट्रक शहरापासून अवघ्या चार कि.मी.अंतरावर गेला असता समोरून येणाऱ्या प्रवासी अ‍ॅपे चालकाला जोराची धडक देवून अपघात झाला. या अपघातामध्ये प्रवासी अ‍ॅपेमधील पाच जण ठार झाल्याची भीती व्यक्त होत आहे. त्यात दोन लहान मुलांचा समावेश आहे. मद्यधुंद अवस्थेतील ट्रक चालक तसाच भरधाव वेगाने पुढे निघाला.

आठ कि.मी.अंतरावर असणाऱ्या घोडका राजुरी तळ्याच्या पुढे त्याने समोरून येणाऱ्या मोटारस्वारास चिरडले. या घटनेनंतर तोल गेल्याने ट्रक पलटी झाला. या अपघातामध्ये अ‍ॅपे रिक्षामधील पाच जण ठार झाल्याची भीती व्यक्त होत असताना मोटारसायस्वार गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे.

ही घटना रविवारी रात्री सव्वासातच्या सुमारास घडली. घटनेची माहिती कळताच जिल्हा रूग्णालयातील रूग्णवाहिका आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. अपघात एवढा गंभीर होता की, अ‍ॅपेरिक्षा अक्षरश: उद्धवस्त झाला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या