उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये दिल्ली-मेरठ महामार्गावर अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात तीन मित्रांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे..
गाझियाबादच्या मसूरी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये सदर घटना घडली आहे. दिल्लीवरुन मेरठला तीन मित्र दुचाकीवरुन जात होते. पहाटे तीनच्या दरम्यान भरधाव गाडीने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. त्यांना तत्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र डॉक्टरांनी तिघांनाही मृत घोषित केले. त्यामुळे कुटुंबीयांना धक्का बसला आहे. अंशु, बिट्टू आणि विपीन अशी अपघातात मृत्यू झालेल्या तरुणांची नावे आहेत.
पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. तसेच सीसीटीव्हीच्या आधारे दुचाकीला उडवणाऱ्या वाहन चालकाचा शोध घेतला जात आहे, अशी माहिती पोलीस अधिकारी सिद्धार्थ गौतम यांनी दिली.