खेड सवेणी येथील गुजर कुटुंबावर काळाचा घाला, मारुती कार ट्रकवर आदळून तीन ठार, दोन गंभीर

44

सामना ऑनलाईन, खेड
शिमगोत्सवानिमित्त मुंबईहून खेड तालुक्यातील सवेणी गावी येणाऱ्या गुजर कुटूंबावर सोमवारी महामार्गावरील कळंबणी गावाजवळ काळाने घाला घातला. पुढील वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या नादात समोरुन आलेल्या ट्रकला धडकून गुजर यांची मारूती स्विप्ट कार गटारात कोसळल्याने कारमधील एका महिलेसह तीघेजण जागीच ठार झाले तर दोघे गंभीर जखमी झाले. हा अपघातात दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास घडला. दुसरा अपघात पहाटे ५.१५ वाजता महामार्गावरील एक्सेल फाटा येथे घडला. परेल ताम्हणमळा या एसटीबसच्या चालकाचा ताबा सुटल्याने बस पुढे असलेल्या ट्रकवर आदळून दोन बालकांसह १४ जण जखमी झाले.

खेड तालुक्यातील सवेणी या मुळ गावचे परंतू सध्या मुंबईत लोअर परेल येथे स्थाईक असलेले गजानन गुजर (५०), त्यांची पत्नी वंदना गुजर (४५), मुलगा प्रितम गुजर (३०), सुन प्रणाली गुजर (२५) व सखाराम मुकूंद चेदंवणकर (५०) हे पाचजण मारुती स्विप्ट कारने शिमगोत्सवासाठी मुंबईतून सवेणी येथे येत होते. दुपारी 3 वाजत ते कळंबणी नजीक आले असता पुढील वाहनाला ओव्हरटेक करताना भरधाव वेगातील कार समोरून येणाऱ्या ट्रकवर आदळली आणि काही कळायच्या आत बाजूच्या चेंडूसारखी फेकली गेली.

या भिषण अपघातात कारमधून प्रवास करणारे गजानन गुजर, त्यांची पत्नी वंदना गुजर व सखाराम चेंदवणकर यांचा जागीच मृत्यु झाला तर प्रितम व प्रणाली हे दोघे गंभीर जखमी झाले. अपघातादरम्यान झालेल्या मोठय़ा आवाजाने आजुबाजुच्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. कारमध्ये अडकून पडलेल्या प्रवाशांना तात्काळ बाहेर काढण्यात आले. दरम्यान नरेंद्र महाराज संस्थानाची रुग्णवाहिका तसेच खेड पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांना तात्काळ नजीकच्या कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतू गजानन गुजर, वंदना गुजर व सखाराम चेंदवणकर यांचा रुग्णालयात दाखल करण्यापुर्वीच मृत्यु झाला होता. या अपघात गंभीर जखमी असलेले प्रितम व प्रणाली यांच्यावर कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.अपघाताची खबर मिळताच खेड येथे असलेल्या राज्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम, केशवराव भोसले, योगेश कदम यांनी तात्काळ कळंबणी रुग्णालयात जावून जखमींची विचारपुस केली.

दुसरा अपघात पहाटे ५.१५ वाजता महामार्गावरील एक्सेल फाटा येथे घटला. मुंबईहून ताम्हणमळा येथे प्रवाशी घेऊन निघालेली एसटी बस ही एक्सेल फाटा येथे आली असता एसटी चालक लक्ष्मीकांत विनायक पाटील याचा बसवरील ताबा सुटला आणि त्या एसटी बसने पुढे असलेल्या ट्रकला मागून जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की साखर झेपेत असलेल्या एसटी प्रवाशांपैकी १४ प्रवाशी जखमी झाले.

या अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांमध्ये स्नेहल दशरथ कदम (२६), धुव निलेश कदम (०२), रोहिदास हरिश्चंद्र चव्हाण (५८), रोहिणी रोहिदास चव्हाण (५६), स्वामी राजाराम खापरे, (२४), माधुरी महेंद्र साळवी (४८), सचिन कृष्णा कदम (२५), तुषार यशवंत कांबळे, (३८), दुर्वा पराग कदम (०१), मानसी पराग कदम (२९), विजय भागोजी चव्हाण, (६४), पराग गोपाळ कदम हे जखमी झाले. या अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांना नजीकच्या पर्शुराम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या