हिंदुस्थानी वंशाच्या विवेक मूर्ती यांना राजीनामा देण्याचा ट्रम्प सरकारचा आदेश

25

सामना ऑनलाईन । वाशिंग्टन

अमेरिकेमध्ये ट्रम्प सरकार आल्यापासून हिंदुस्थानी वंशाच्या नागरिकांवर प्रमुख पदावरून पायउतार होण्याची नामुष्की ओढवली आहे. ट्रम्प सरकारनं ओबामा सरकारच्या काळात नियुक्त केलेले हिंदुस्थानी वंशाचे सर्जन जनरल विवेक मूर्ती यांना पदाचा राजीनामा देण्याचा आदेश दिला आहे. मूर्ती यांच्या पदावर ट्रम्प सरकारच्या पसंतीचा व्यक्ती बसवण्यात यावा यासाठी हा आदेश देण्यात आल्याचं बोललं जात आहे.

अमेरिकेच्या आरोग्य मंत्रालयानं शुक्रवारी सांगितलं की, ‘यूएस पब्लिक हेल्थ सर्विस कमीशन्ड कॉर्प्स’चे नेते मूर्ती यांना ट्रम्प सरकारनं सर्जन जनरल पदावरून पायउतार होण्यास सांगितलं आहे. मूर्ती यांना सर्जन जनरल पदावरून मुक्त करण्यात आलं असलं तरी ते कमीशन्ड कॉप्सचे सदस्य म्हणून पुढे काम करू शकतील.

या नंतर मूर्ती यांनी फेसबुकवर पोस्ट करत सर्जन जनरल पदावर काम करण्याची संधी दिल्याबद्दल आभार मानले. तसंच ‘एका गरीब हिंदुस्थानी शेतकऱ्याच्या नातवाची राष्ट्राध्यक्षांनी संपूर्ण देशाच्या आरोग्याची देखभाल करण्यासाठी नेमणूक केली ही अभिमानाची गोष्ट आहे. ४० वर्षांपूर्वी माझ्या परिवाराचं स्वागत केलं आणि काम करण्याची संधी दिल्याबद्दल मी या देशाचा आभारी आहे असंही फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे. सर्जन जनरल पदावर विराजमान होणारे विवेक मूर्ती हे पहिले हिंदुस्थानी वंशाचे नागरिक आहेत.

याआधीही ट्रम्प सरकारनं प्रीत भरारा या हिंदुस्थानी वंशाच्या नागरिकाला अमेरिकेच्या महाअधिवक्ता पदावरून पायउतार होण्याचा आदेश दिला होता. मात्र राजीनामा देण्यास नकार देणाऱ्या भरारा यांना ट्रम्प सरकारनं कामावरुन काढलं होतं.

आपली प्रतिक्रिया द्या