अमेरिकेला सायबर हल्ल्याचा धोका; राष्ट्रीय संकट घोषित

सामना ऑनलाईन । वॉशिंग्टन

अमेरिकेला सायबर हल्ल्याचा धोका असल्याने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी राष्ट्रीय संकट घोषित केले आहे. एक आदेश काढून त्यांनी ही घोषणा केली आहे. देशातील संगणकांना संभाव्य सायबर हल्ल्यापासून वाचवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच राष्ट्रीय सुरक्षेसाठी आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या आहेत.

ट्रम्प यांच्या आदेशानुसार अमेरिकेतील कंपन्यांना परदेशी टेलिकॉम कंपन्यांची सेवा वापरण्यास मनाई करण्यात आली आहे. परदेशी टेलिकॉम कंपन्यांकडून राष्ट्रीय सुरक्षेला धोका असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे. मात्र, या आदेशात कोणत्याही परदेशी टेलिकॉम कंपनीचे नाव घेण्यात आलेले नाही. मात्र, चीनची टेलिकॉम कंपनी हुवावेकडून धोका असल्याचा संशय आल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. हुवावे ही कंपनी आपल्या विविध उत्पादनांमधून हेरगिरी आणि गोपनीय माहिती जमवत असल्याचा अनेक देशांचा आरोप आहे. मात्र, कंपनीकडून या आरोपांचे खंडन करण्यात येत आहे. आपल्या सेवेमुळे कोणत्याही ग्राहकाला किंवा देशाला नुकसान झालेले नाही. आपण हेरगिरी किंवा माहितीची चोरी करत नसल्याचेही कंपनीने स्पष्ट केले आहे.

देशाच्या शत्रूपासून देशाचे रक्षण करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे व्हाईट हाऊसकडून सांगण्यात आले. अमेरिकेचे काही शत्रू संचार यंत्रणेचा गैरवापर करून देशाच्या सुरक्षेला धोका निर्माण करण्याची शक्यता आहे. तसेच देशाला सायबर हल्ल्याचाही धोका आहे. त्यामुळे देशातील संगणक आणि दूरसंवाद यंत्रणा अशा संभाव्य धोक्यांपासून वाचवण्यासाठी हा आदेश काढण्यात आल्याचे व्हाईट हाऊसने स्पष्ट केले आहे. एका हिंदी वृत्तवाहिनीने याबाबतचे वृत्त दिले आहे.