ट्रम्प यांच्या दौऱ्यामुळे 45 कुटुंबांवर बेघर व्हायची वेळ, पालिकेने पाठवली नोटीस

531

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या गुजरात दौऱ्यावर टीका होताना दिसत आहे. आधी ट्रम्प येणार म्हणून त्यांना मार्गातील झोपड्या दिसू नये म्हणून भिंतीचे कुंपणही तयार केले जात असल्याचे वृत्त काही दिवसांपूर्वी प्रकाशित झाले होते. त्यावर सर्वत्र टीकेची झोड उठली होती. आता अहमदाबाद येथील पालिकेने 45 कुटुंबांना ते राहत असलेली जागा रिकामी करण्याचे आदेश दिले आहेत.

जनसत्ताने दिलेल्या वृत्तानुसार, गुजरातच्या अहमदाबाद येथील मोटेरा स्टेडिअमजवळ झोपडपट्टीत राहणाऱ्या 200 कुटुंबांना त्यांची घरं सोडून जाण्यासाठी सांगण्यात आलं आहे. मोटेरा स्टेडिअममध्ये नमस्ते ट्रम्प हा कार्यक्रम होणार आहे. त्यामुळे स्टेडिअम शेजारील झोपडपट्ट्या रिकाम्या करण्यात येत आहेत, असं स्थानिकांचं म्हणणं आहे. या 200 घरांमध्ये बांधकाम करणारे रोजंदारी मजूर राहतात. तसंच यातील बहुतांश मजूर हे मजूर अधिकार मंचाचे नोंदणीकृत कामगार आहेत. यांपैकी 45 कुटुंबांना पालिकेने नोटीस पाठवून जागा रिकामी करण्याचे आदेश दिले आहेत.

येथे राहणाऱ्या स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, या कार्यक्रमामुळेच त्यांना तिथून निघून जाण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ते गेल्या वीस वर्षांपासून तिथे राहत आहेत, असा दावा त्यांनी केला आहे. दुसरीकडे, अहमदाबाद येथील पालिकेने मात्र, या कार्यक्रमाचा आणि कुटुंबांना पाठवण्यात आलेल्या नोटीशींचा काहीही संबंध नसल्याचं म्हटलं आहे.

आपली प्रतिक्रिया द्या