सिद्धूची ‘वसुली भाई’

827

>> वरद चव्हाण

तृप्ती सिद्धार्थ जाधव. घरचे संस्कार सर्वार्थाने घेऊन तृप्ती विचारपूर्वक सौ. सिध्दार्थ झाली आणि खऱ्या अर्थाने सिध्दूची गाडी मार्गी लागली.

नमस्कार, ‘हेचा मामा मामाचा का मामा’! ‘हेचा मामा’वरूनच तुमच्या लक्षात आलंच असेल की, हा लेख कोणाच्या संदर्भात असणार आहे ते! बरोबर ओळखलंत, मी मराठी इंडस्ट्रीमधील मोस्ट एनर्जेटिक सुपरस्टार सिद्धार्थ जाधवबद्दल बोलतोय आणि आपला आजचा लेख सिद्धार्थ जाधव याची पत्नी ‘तृप्ती सिद्धार्थ जाधव’ हिच्यावर असणार आहे. तुम्हाला नेहमीच प्रश्न पडत असेल ना की, ज्या माणसात एवढा उत्साह आहे, त्याची बेटर हाफसुद्धा तेवढीच उत्साही असेल? माझं मत विचाराल तर ही जोडी खरंच ‘मेड फॉर इच अदर’आहे.

सिद्धार्थ जेवढा उत्साही आणि इमोशनल आहे, तेवढीच तृप्ती शांत व प्रॅक्टिकल आहे. तृप्ती कॉलेजमध्ये असताना जर्नलिझमचा कोर्स करत होती. तेव्हा ती एकदा देवेंद्र पेम यांच्या ‘राम भरोसे’ या नाटकाच्या ऑडिशनसाठी गेली होती. तिकडे सिद्धू व तृप्तीची ओळख झाली. आपल्या सिद्धूसाठी तरी हे ‘लव्ह ऍट फर्स्ट साईट’सारखा प्रकार होता. कारण भेटल्यानंतर 3-4 दिवसांतच तृप्ती हे नाटक करू शकणार नाही असं लक्षात येताच त्यानं एल्फिन्स्टन स्टेशनवर तृप्तीला प्रपोजसुद्धा करून टाकलं.

तृप्तीला मात्र हे वागणं पटलं नाही. तिनं स्टेशनवरच सिद्धूला नकार तर दिलाच, त्याशिवाय त्याला स्टेशनवरच सगळय़ांसमोर सुनावलंसुद्धा. तृप्तीच्या या वागण्यामागे आपल्याला तिची बाजू पण समजून घ्यायला हवी. एकतर ओळख नसताना प्रपोज करणं हे कुठल्याही मुलीला न पटण्यासारखंच आहे. याशिवाय तृप्तीचं माहेरचं आडनाव ‘अक्कलवार’. म्हणजे तृप्ती एका वेल सेटल साऊथ इंडियन फॅमिलीमध्ये वाढलेली मुलगी. तृप्तीच्या आई-बाबा स्वतःच्या धर्माबाबत प्रचंड अभिमानी. पण तरी आपल्या सिद्धूने हार मानली नाही. ‘‘जेव्हा कधी तू लग्नाचा विचार करशील तेव्हा माझा विचार नक्की कर. तोवर आपण चांगले मित्र राहू’’ असं म्हणत सिद्धू तिथून निघाला. पुढील चार-पाच वर्षे दोघांत चांगली मैत्री झाली आणि अखेर सिद्धूने तृप्तीचं मन जिंकलं व तिने लग्नासाठी होकार दिला, पण यापुढचा प्रवास अजूनही खडतर असणार होता. तृप्तीची स्वतःची गाडी होती आणि सिद्धूकडे तेव्हा ना नाव होतं, ना पैसा! शेवटी तृप्तीची मैत्रीण ‘अपर्णा’मुळेच मे 2007 ला हे लग्न शक्य झालं.

अपर्णाने लग्न लावून देण्यासाठी सर्व प्रकारची मदत तर केलीच, शिवाय लग्नाच्या दोन दिवस आधी दोघांना अंधेरीला वन रूम किचनसुद्धा मिळवून दिलं. या रूमचं भाडं होतं सात हजार. तृप्तीचा तेव्हाचा पगार 12 हजार व सिद्धूला एका कार्यक्रमामुळे 20-25 हजार रुपये मिळाले होते. त्यामुळे लग्नाचा खर्च व रूमचं सुरुवातीचं भाडं तरी निघून गेलं. तृप्ती मन लावून तिची नोकरी करत होती व तिला त्यात प्रचंड यश मिळत होतं. सिद्धूलाही छोटी-मोठी कामं मिळत होती व मोठमोठय़ा दिग्दर्शकांकडून त्याच्या कामाचं कौतुकही होत होतं. लग्नाच्या चार वर्षांनंतर या दोघांना एक मुलगी झाली. तिचं नाव ‘स्वरा’ ठेवण्यात आलं. लग्नानंतरच्या या 5-6 वर्षांत तृप्तीच्या असं लक्षात येत होतं की, सिद्धू अजिबात व्यवहारी किंवा पैशांच्या बाबतीत प्रोफेशनल नाही. अनेक कामं तो मैत्रीसाठी करत असतो. बऱयाच वेळा मैत्रीखातर कमी मानधन घेणं, ठरलेलं मानधन न मिळाल्यास समोरच्याला जाब न विचारणं, टीडीएस संदर्भातले घोळ अशा अनेक गोष्टी स्वतःच्या नवऱयाबरोबर होत असल्याची खंत तिला वाटत होती. ‘स्वरा’देखील आता दोन वर्षांची झाली होती. अशावेळी साधारण 2013 साली तृप्तीने एक धाडसी निर्णय घेतला. स्वतःची 70 हजारांच्या पगाराची नोकरी सोडून तिने स्वतःचं लक्ष पूर्णपणे सिद्धूच्या व्यवहाराकडे द्यायचे ठरवले. मग सिद्धूच्या मानधनाबाबतची चर्चा, मानधन वेळेत मिळावे म्हणून निर्मात्याला फोन करणे, निर्मात्याने टीडीएस न भरल्यास त्याला त्याचं कारण विचारणे, सिद्धूच्या कष्टाचे पैसे योग्य ठिकाणी गुंतवणे हा संपूर्ण कारभार तिने स्वतःच्या हाती घेतला.

तिच्या या अशा येणाऱया फोनमुळे ती इंडस्ट्रीमध्ये ‘वसुली भाई’ म्हणून पण ओळखली जात होती असं ती गमतीत म्हणतेसुद्धा. ‘ईश’च्या रूपात दोघांच्या आयुष्यात अजून एका मुलीने जन्म घेतला. सिद्धूच्या मेहनतीने व तृप्तीच्या योग्य गुंतवणुकीमुळे आज ते दादरमध्ये एका उच्चभ्रू टॉवरमध्ये स्वतःच्या स्वप्नातील मोठं घर घेऊ शकले आहेत.

तृप्तीने आता 2020 साली एक संकल्प केला आहे. तिला पुन्हा घरातून बाहेर पडून स्वतःचा एक बिझनेस उभा करायचा आहे. तृप्ती जे ठरवते ते काम नुसतं पूर्णच नाही करत तर त्यात यशस्वीसुद्धा होते आणि ती तिच्या या नवीन बिझनेसमध्येसुद्धा यशस्वी होईल यात काही शंका नाही. सिद्धू जितका मेहनती, इमोशनल, अव्यवहारी तितकीच तृप्ती प्रोफेशनल, बिझनेस ओरिएन्टेड व एक हुशार इन्व्हेस्टर. आहे की नाही हे आपल्या मराठी इंडस्ट्रीचं एक यशस्वी बॅलन्स्ड कपल!

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या