शिक्षकाचा आझाद मैदानात गळफास घेण्याचा प्रयत्न

32

सामना ऑनलाईन, मुंबई

गेल्या २३ वर्षांपासून सातत्याने नोकरी करूनही वेतन नाही. घरची परिस्थिती अत्यंत बिकट. त्यामुळे बायको, मुलांसह वृद्ध आईवडिलांची होणारी उपासमार. या सर्वांना कंटाळून वाशीम जिह्यातील क्रांतिवीर लहूजी विद्यामंदिर या विनाअनुदानित शाळेच्या शिक्षकाने आज आझाद मैदानातच झाडाला गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे एकच खळबळ उडाली. शेवटी आझाद मैदान पोलिसांनी तब्बल अर्धा तास विनवणी केल्यानंतर भानुदास खंडारे खाली उतरले.

शाळेचे तत्कालीन मुख्याध्यापक देशमुख व विद्यमान मुख्याध्यापक राऊत यांनी आपली वेतनाची फाइलच शिक्षणाधिकाऱ्यांकडे पाठवली नाही. त्यामुळे आपल्यावर घोर अन्याय झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे. गेल्या २३ वर्षांपासून आपण शिक्षण विभागाकडे सातत्याने पत्रव्यवहार करत आहोत; परंतु आजतागायत न्याय मिळाला नाही, असे खंडारे यांचे म्हणणे आहे.

पोलिसांनी खंडारेंना शिक्षण विभागात नेले. शिक्षण विभागातील उपसचिवांनी त्यांचे म्हणणे ऐकून घेऊन सुनावणीसाठी येत्या ४ एप्रिल रोजी बोलावले आहे, अशी माहिती आझाद मैदान पोलिसांनी दिली.

आपली प्रतिक्रिया द्या