प्रलंबित मागण्या, सानुग्रह अनुदान द्या, अन्यथा आंदोलन ; टीबी नियंत्रण कर्मचाऱयांचा इशारा

मुंबई पालिकेच्या क्षयरोग नियंत्रण उपक्रमात  गेल्या 20 वर्षांपासून काम करणाऱयांच्या अनेक मागण्या गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. शिवाय त्यांना सानुग्रह अनुदानही मिळत नाही. त्यामुळे प्रलंबित मागण्या मान्य करा, सानुग्रह अनुदान द्या अन्यथा ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा कर्मचाऱयांच्या वतीने म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेने दिला आहे. प्रशासनाच्या दिरंगाईचा निषेध करण्यासाठी हे कर्मचारी उद्या जागतिक टीबी दिनाच्या पार्श्वभूमीवर कर्मचारी काळय़ा फिती लावून काम करणार आहेत.

महापालिकेच्या अखत्यारीतील क्षयरोग नियंत्रण संस्थेत पंत्राटी तत्त्वावर काम करणाऱया कर्मचाऱयांच्या कामाचा व्याप जास्त असताना त्यांना पगाराव्यतिरिक्त कोणताही आर्थिक मोबदला देण्यात येत नाही; परंतु म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेने या कर्मचाऱयांना सानुग्रह अनुदान (बोनस) मिळावा म्हणून मागील वर्षांपासून पाठपुरावा सुरू ठेवला आहे. काही प्रशासकीय अधिकाऱयांच्या आडमुठेपणामुळे या कर्मचाऱयांना अद्याप सानुग्रह अनुदान मिळू शकलेले नाही. मात्र आमची संघटना या कामगार, कर्मचाऱयांच्या पूर्णपणे पाठीशी उभी असून या कर्मचाऱयांना सानुग्रह अनुदान मिळवून देण्यासाठी 24 मार्च रोजी ‘जागतिक क्षयरोग दिना’चे महत्त्व लक्षात घेऊन प्रशासनाचा निषेध म्हणून काळय़ा फिती लावून काम करणार आहे. शिवाय प्रलंबित मागण्या मान्य केल्या नाहीत तर कोणत्याही क्षणी ठिय्या आंदोलन करणार आहेत, अशी माहिती म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेना अध्यक्ष बाबा कदम व चिटणीस संजय वाघ यांनी दिली आहे.