तुकाराम महाराजांच्या पालखीतील पादुका उचलण्याचा मान माजलगाव तालुक्याला

सुधीर नागापुरे । माजलगाव

विटेवरी उभा असलेल्या पांडुरंगाचे भेटीला आतुर झालेल्या तुकाराम महाराजांच्या पादुका उचलण्याचा मान बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्याला म्हणजे तालुक्यातील गंगामसला येथील किसनराव सोळंके यांना मिळाला. त्यांनी संत तुकारामांच्या पादुका उचलून डोक्यावर घेत ‘ज्ञानोबा-तुकोबा’ च्या जयघोषात देहू येथून पालखी सोहळ्याची सुरूवात झाली. ‘नको पांडुरंगा मला सोन्याचे-चांदीचे दान रे… फक्त भिजव पांडुरंगा हे तहानलेले रान रे…’ अशी आर्त आळवणी भक्तीरसात तल्लीन झालेल्या वारकऱ्यांनी करताच वरुणराजाही पालखीवर बरसला.

मराठवाड्यात निजामशाहीचे आधिपत्य होते, तर पुणे भागात इंग्रजी राजवटीच्या अंमल होता. पुणे पंढरपूर भागांत कुठेही पक्के रस्ते नव्हते, धड पायवाटा सुद्धा नव्हत्या. शिवाय देशात लोकशाही नसल्याने,परमुलुखात फिरणेही अवघड होते. अशा परिस्थितीमुळे संत तुकाराम महाराजांच्या पादुकांची पंढरपूर वारी करण्यासाठी कोणीही धजावत नव्हता. अशा परिस्थितीत गंगामसला येथील रावसाहेब मालिपाटील, घनश्याम, दादामहाराज, सिताराम, गोपाळ सोळंके-जहागिरदार आणि यांनी श्री संत तुकाराम महाराजांच्या पादुका डोक्यावर घेवून पंढरपूरची वारी केली आणि या सोहळ्याला कधीही बंद पडू दिले नाही.

सोळंके यांनी केवळ श्री संत तुकाराम महाराजांवरील श्रद्धेपोटी त्या काळात न डगमगता हें कार्य नियमितपणे पार पाडलेे. महाराजांच्या पादुका डोक्यावर घेत न चुकता नित्यनियामाने पंढरपूरची वारी केली. त्यांचे नंतर कार्य तहहयात पार पाडले. पुढे या वारीचे रुपांतर खूप मोठ्या सोहळ्यात झाले. मात्र गंगामसला येथील सोळंके-जहागिरदार यांचा पालखीचा मान तसाच सुरू राहिला. काळाच्या ओघात पुढे या पालखी सोहळ्याचा मान गंगामसला गावातील सोळंके-जहागिरदार यांच्या चारही वाड्यात विभागला गेला.

आज तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यातील पादुका रथावर विराजमान असलेली जी मंडळी असते, ती सर्व गंगामसला येथीलच असतात. हा सोहळा पंढरपूर येथे जावून काला झाल्यानंतर संपतो. मात्र त्यानंतर सुद्धा तुकारामाच्या पादुका पंढरपूर येथून देहू येथे पोहोचत नाहीत, तोपर्यंत या पादुकांची पूर्ण जिम्मेदारी गंगामसलेकर यांचीच असते.

तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे गंगामसला येथील सोळंके-जहागिरदारांचे चार वाडे मानकरी आहेत. चक्राकार पद्धतीने दरवर्षी हा मान एका वाड्याला मिळतो. मात्र या वाड्यातील जो कोणी दहा वर्षे तुकाराम महाराजांच्या पालखीबरोबर चालतो, अशाच वारकऱ्यांस या सोहळ्यातील पादुका उचलण्याचा मान दिला जातो, चार वाड्यात प्रामुख्याने किसनराव सोळंके-जहागिरदार, माऊली आबा सोळंके-जहागिरदार, नारायणदादा सोळंके-जहागिरदार आणि अनंत अप्पा सोळंके-जहागिरदार अशी या वाडा प्रमुखांची नावे असून वाडे कुणा व्यक्तीच्या नावाने नसून, ते थोरला वाडा, चौथाई वाडा, माळकरी वाडा आणि अंदुबाचा वाडा अशा नावाने ओळखले जातात. सोमवारच्या पालखी प्रस्थानावेळी जुन्या पिढीतील जगंनाथ महाराज सोळंके-जहागिरदार, नारायण सोळंके-जहागिरदार भगवान सोळंके-जहागिरदार, विष्णूपंत सोळंके-जहागिरदार, माऊली आबा सोळंके-जहागिरदार, आणि नव्या पिढीतील सतीष, श्रीकृष्ण, भागवत, किशोर, अनंत, जयवंत, सचिदानंद सोळंके हे मोठ्या भक्ती भावाने सहभागी झाले होते.