बाय, बाय..! कठोर निर्णय घेणारे तुकाराम मुंढे झाले भावुक, फेसबुक पोस्ट व्हायरल

नुकतेच कोरोना संसर्गातून बरे झालेले नागपूर महापालिकेचे माजी आयुक्त तुकाराम मुंढे यांनी त्यांच्या फेसबुक पेजवरून नागपूरला बाय बाय म्हटले आहे. नागपूरकरांनी सात महिन्याच्या कालखंडात जी साथ दिली त्याबद्दल त्यांनी नागरिकांना धन्यवाद दिले आहे. जीथे कुठे असेल आपले प्रेम कायम असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

तुकाराम मुंढे यांनी फेसबुक पेजवर जे लिहीले त्यात त्यांनी म्हटले की, कोविड विषाणुच्या संक्रमणातून नुकतेच मुक्त झालेलो आहे. त्यानंतर अनेकांनी मला भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती. प्रत्येकाला भेटण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. नागपूरकरांच्या माझ्याप्रती असलेल्या भावनांचा मी आदर करतो. आयुष्यभर नागरिकांनी दिलेल्या प्रेमाच्या कणात राहील. मनपा आयुक्त म्हणून जे काही अधिकार मिळाले होते त्याचा योग्य व पुरेपूर वापर केला. प्रसंगी कठोर निर्णय देखील घेतले. महापालिकेचा कार्यकाळ हा खुपकाही शिकवणारा ठरला. कठोर निर्णयावर टीका झाली. परंतु, जनतेच्या हितासाठी सर्व निर्णय घेतल्याचे समाधान देखील आहे.

नागपूर महापालिकेच्या आयुक्त पदाच्या कार्यकाळातील अनुभव आयुष्यभरासाठी शिदोरी म्हणून कामात येईल, यात शंका नाही. या दरम्यान, जे-जे चांगले शिकायला मिळाले, ते शिकलो. काही कटू अनुभव असतीलही परंतु, यातूनही बोध घेतला. नव्या ठिकाणी रुजू होण्यासाठी उद्या मुंबईला रवाना होतोय. जेथे कुठे असेल, आपले प्रेम कायम सोबत असेल. या शहरासाठी काही चांगले करण्याचा प्रयत्न केला, याचा अभिमान असेल असे म्हणत मुंढे यांनी नागपूर महानगरपालिकेतील कटू-गोड आठवणींसह मनपाला गुडबाय केला आहे. सर्वांनी जी साथ दिली त्याबद्दल धन्यवाद दिले आहे.

भेटीसाठी चाहत्यांच्या रांगा
तुकाराम मुंढे हे शुक्रवारी मुंबईला रवाना होणार आहेत. आपल्या शिस्तबद्ध कार्यशैलीमुळे अल्पावधीत लोकप्रिय झालेले तुकाराम मुंढे यांची भेट घेण्यासाठी लॉ कॉलेज चौकातील त्यांच्या वसतीगृहापुढील निवास्थानी दिवसभर रांगा लावल्या.

नागपूरकर भगिनीचा नवस
मुंढे यांच्या प्रकृती रक्षणासाठी एका नागपूरकर भगिनीने नवस केला होता. ते कोरोनामुक्त झाल्याचे कळताच तिने मुंढे यांना राखी बांधून त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना केली. नागरिकांची भेटीची इच्छा बघता मुंढे यांनीही त्यांना भेट दिली

आपली प्रतिक्रिया द्या