पाकिस्तानएवढाच कश्मीर आम्हालाही प्रिय, तुर्कस्तानच्या राष्ट्रपतींनी ओकली गरळ

1268

पाकिस्तानएवढाच कश्मीर आम्हालाही प्रिय आहे. कश्मीरच्या मुद्दय़ावर तुर्कस्तानचा पाकिस्तानला विनाअट पाठिंबा असून कश्मीरमध्ये सध्या जे काही सुरू आहे ते अमानवीय असल्याचे गरळ तुर्कस्तानचे राष्ट्रपती रिसेप तैयप ऍर्डोगन यांनी ओकले.

तुर्कस्तानचे राष्ट्रपती रिसेप तैयप ऍर्डोगन सध्या पाकिस्तानच्या दौऱयावर आहेत. पाकिस्तानी संसदेत भाषण करताना ऍर्डोगन यांनी हिंदुस्थानवर तोंडसुख घेतले. कश्मीर पाकिस्तानला जेवढा प्रिय आहे तेवढाच आम्हालाही प्रिय आहे, मात्र सध्या कश्मीरमध्ये जे काही चालू आहे ते भयंकर आहे, अमानवीय आहे असे अकलेचे तारे ऍर्डोगन यांनी तोडले. कश्मीर प्रश्नावर पाकिस्तानने घेतलेल्या भूमिकेला तुर्कस्तानचा विनाअट पाठिंबा असल्याचेही त्यांनी यावेळी जाहीर केले.

इम्रान खान ड्रायव्हर बनले
पाकिस्तान दौऱयावर आलेले तुर्कस्तानचे राष्ट्रपती रिसेप तैयप ऍर्डोगन यांच्या स्वागतासाठी पंतप्रधान इम्रान खान यांनी राजशिष्टाचार मोडला. इम्रान खान यांनी स्वतः गाडी चालवून ऍर्डोगन यांना संसदेपर्यंत नेले.

इस्लामी हुकूमशहा…
तुर्कस्तानमध्ये रिसेप तैयप ऍर्डोगन यांची तुलना बशर अल असद, मुअम्मर गद्दाफी तसेच सद्दाम हुसैन या हुकूमशहांशी केली जाते. ऍर्डोगन यांना तुर्कस्तानला युरोपीय संघात नेण्याची इच्छा आहे. दुसरीकडे ते ऑटमन साम्राज्य पुन्हा स्थापन करण्यासाठीही प्रयत्न करत आहेत. तुर्कस्तानचे माजी राष्ट्रपती कमाल अतातुर्क यांचा ‘कमालवाद’ संपवून कट्टरपंथीय तुर्क करण्याचा त्यांचा मनसुबा आहे.

आपली प्रतिक्रिया द्या