वांबोरीचं खास आकर्षण, आई तुळजाभवानीचा पालखी सोहळा उत्साहात साजरा

172

गणेश पुराणिक । नगर

महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या पालखीचा उत्सव रविवारी नगर जिल्ह्यातील वांबोरी गावामध्ये साजरा करण्यात आला. आई तुळजाभवानीचे माहेरघर राहुरी आहे. तुळजाभवानीची पालखी राहुरीमध्ये तयार होते आणि बारा बलुतेदारांकडून मानसन्मान घेत पिंपरी-अवघड, सडे यामार्गे वांबोरीमध्ये दाखल होते. अनेक शतकांपासून सुरू असलेली ही परंपरा वांबोरी गावाने आजही जपली आहे.

गौरी-गणपतीनंतर आणि नवरात्र सुरू होण्यापूर्वी सर्व बारा बलुतेदारांना पालखीच्या आगमनाचे वेध लागलेले असतात. गावाच्या वेशीवर सरपंच पालखीचे स्वागत करतात. त्यावेळी आई तुळजाभवानीला साडी-चोळी अर्पण केली जाते आणि महाआरती केली जाते. वांबोरीच्या विद्यमान सरपंच सौभाग्यवती कावेरीताई कृष्णाजी पटारे पाटील यांनी पालखीची आरती केली. महाआरतीनंतर ढोल-ताशांच्या गजरात, अबीरगुलाल-भंडारा उधळत आणि फटाक्यांच्या आतषबाजीत वाजतगाजत पालखीची मुख्य बाजारपेठेतून मिरवणूक निघते. यावेळी सर्व गावकरी मोठ्या उत्साहात पालखीला खांदा देण्यासाठी चढाओढीने पुढे येतात. पालखीच्या मिरवणूक मार्गावर महिलांकडून सडा-रांगोळी घातली जाते.

महाआरती आणि मिरवणूक झाल्यानंतर पालखी गावातील मुख्य भाग असलेल्या चिंचेच्या पारासमोरील वाड्याजवळ विसावा घेते. या भागात पूर्वी तेली समाजाचे व्यापारी पतके यांचा वाडा होता. शतकांपासून त्यांच्या समोर असणाऱ्या पारावर पालखी विसावा घेत आहे. आज ते व्यापारी नाहीत मात्र गावातील नागरिकांनी परंपरा कायम राखली आहे.

पालखीच्या विसाव्याच्या ठिकाणी तेली समाजाचे चोथे कुटुंब (मेहेतर) हे पालखीसोबत आलेल्या सर्व भाविक, सरपंच, संबळवादक याचा मानपान करतात आणि पालखी स्थानापन्न होते. सहा दशकांपूर्वी वांबोरीमध्ये तेलाचे मोठे मोठे घाणे चालत आणि मुंबईपर्यंत तेल पाठवले जाई. पालखीला तेली बांधवांकडून मोठ्या प्रमाणात करडईचे तेल वाहिले जात असे. तसेच पालखीच्या दर्शनासाठी आजूबाजूच्या वाड्यावस्त्यांवरील अनेक भाविक दर्शनाला येत होती. अनेकजण पालखीला नवस बोलतत. त्याकाळी पालखी तब्बल तीन दिवस वांबोरीत मुक्कामी असे. तिन्ही दिवस भारुड, भजनं, जागरण-गोंधळ अशा अनेक कार्यक्रमांची रेलचेल असे.

वांबोरीमधील तेली समाजातील बांधव दरवर्षी वर्गणी काढून पालखीसोहळ्याचे नियोजन करतात. यावेळी भाविकांना प्रसाद वाटप करण्यात येते. त्यानंतर मोठ्या भक्तिभावाने पुन्हा एकदा पालखी खांद्यावर घेऊन मग खेळवली जाते. वांबोरीच्या संस्कृती परंपरेत “मैलाचा दगड” ठरलेल्या आणि थेट तुळजापुराच्या भवानीमातेशी वांबोरीचं आणि वांबोरीकरांचं साताजन्मांचं नातं सांगणाऱ्या या पालखीची म्हणूनच प्रत्येकजण वाट पाहत असतो.

पाहा पालखी सोहळा –
…………………………………………………………………………………………..

आपली प्रतिक्रिया द्या