पुढील पाच वर्षात तुळजापूरला जागतिक पर्यटन स्थळाचा दर्जा देणार – अमित शहा

505

ज्या तुळजाभवानी मातेने छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्य आणि सुराज्याची प्रेरणा दिली. त्या तुळजाभवानी मातेच्या तुळजापूरला येत्या पाच वर्षात जागतिक पर्यटन स्थळाचा दर्जा देण्यात येईल, अशी ग्वाही केंद्रीय गृहमंत्री तथा भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी तुळजापूर येथील जाहीर सभेत दिली. तुळजापूर विधानसभा मतदारसंघातील शिवसेना – भाजपा महायुतीचे उमेदवार राणाजगजितिंसह पाटील यांच्या प्रचारासाठी त्यांची जाहिर सभा हाडको मैदानावर आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी राज्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख, जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा. डॉ. तानाजीराव सावंत, भाजपाचे प्रदेश सरचिटणी आमदार सुजितसिंह ठाकूर, भाजपाचे जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी, जेष्ठ नेते अ‍ॅड. मिलींद पाटील यांच्यासह महायुतीचे उमेदवार राणाजगजितिंसह पाटील यांची उपस्थिती होती.

छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्य आणि सुराज्याची प्रेरणा देऊन तलवार देणारी महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या दरबारी येण्याचे भाग्य लाभल्याबद्दल मी स्वतःला भाग्यवान समजतो असे सांगून जनतेची काळजी घेणारा जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासारखाच कारभार पाहण्याचे काम सध्या केंद्रात नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस हे करत आहेत. घराणेशाहीच्या विकासापेक्षा देशाची सुरक्षितता व देशाचा विकास महत्वाचा मानणाऱ्या नरेंद्र मोदी यांनी 5 ऑगस्ट रोजी सभागृहात 370 कलम हटविण्याचे ऐतिहासिक काम केले. मागील 70 वर्षात आंतकवाद्यांनी ४० हजार लोकांची कत्तल केली. स्वर्गासारखा कश्मीर उद्ध्वस्त केला. पण 370 कलम हटविण्याचे धैय काँग्रेस – राष्ट्रवादीच्या सरकारने दाखविले नाही. ते साहस मोदीनी करुन दाखविले. भाजपाने नेहमी पक्षापेक्षा देश हिताला प्राधान्य दिले. पण आज राहुल गांधी मात्र पाकिस्तानची भाषा बोलत आहेत. पाकिस्तानची बाजू घेणारे हे नेते हा देश सुरक्षित ठेवतील का? असा प्रश्नही त्यांनी यावेळी केला.

राज्यात काँग्रेस – राष्ट्रवादीच्या काळात या सरकारने प्रत्येक क्षेत्रात भ्रष्टाचार करण्याचे काम केले. त्यामुळे देशात एकेकेकाळी आघाडीवर असणाऱ्य़ा महाराष्ट्राची 16 नंबर पर्यंत घसरण झाली. मात्र या पाच वर्षाच्या काळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भ्रष्टाचार मुक्त शासन असून त्यांनी महाराष्ट्राला नंबर एकवर आणण्याचे काम केले आहे. मराठवाडा सुजलाम सुफलाम व्हावा यासाठी वाटॅरग्रीडला मंजूरी देण्यात आली असून पुढील पाच वर्षात हे काम पुर्ण करण्यात येईल तसेच धाराशीव – सोलापूर रेल्वेमार्गाचे कामही येत्या पाच वर्षात पूर्ण करण्यात येईल असे त्यांनीसांगितले.  नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर विश्वास टाकत या ही वेळी तीन चतुर्थतांश बहुमताने महाराष्ट्रात महायुतीचे सरकार येईल त्यासाठी आपण सर्वांनी या मतदारसंघातील उमेदवार राणाजगजितसिंह पाटील यांना विजयी करण्याचे आवाहन त्यांनी केले.

आपली प्रतिक्रिया द्या