जरा हटके : मी नोंदी ठेवतो

>> तुळशीदास सुर्के, एमएससी

प्रत्येकाला कुठला ना कुठला छंद असतो… तसाच मला महत्त्वाची कात्रणे आणि नोंदी करण्याची आवड आहे. या छंदाचा वारसा मला मिळाला तो माझ्या वडिलांकडून. महत्त्वाची कात्रणे, माहिती जमा करणे हा माझा आणि माझ्या वडिलांचाही आवडता छंद आहे. आमच्या या संग्रहात १९८० ते आजपर्यंतची महत्त्वपूर्ण कात्रणे व नोंदी आहेत. बाबांना कळलं की मीही कात्रणं जमा करतोय, तेव्हा त्यांनी त्यांचा अख्खा संग्रह मला दिला… मग मी त्यात आणखी भर घालत राहिलोय. मला वयाच्या नवव्या वर्षापासून कात्रणं जमवण्याचा छंद लागलाय.

मी आणि बाबांनी आमच्या या संग्रहाची विभागणी केली आहे. कला, क्रीडा, विज्ञान, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय, चित्रे-व्यंगचित्रे असे भाग पाडलेत. यात जवळपास दोन ते तीन हजार कात्रणे आहेत आणि ती आम्ही वेगवेगळ्या फाइल्समध्ये ठेवल्या आहेत तर काही कात्रणे वह्यांमध्ये चिटकवली आहेत. ही कात्रणे गहाळ होणार नाहीत याची आम्ही सतत काळजी घेतो.

जुनी दुर्मिळ चित्रफिती मी संगणकामध्ये डेटा स्वरूपात साठवलेल्या आहेत. छंद पैशांनी विकत मिळत नाही तर तो अनुभवाका लागतो. त्यामुळे मला वाटतं, एकदा कात्रणे, माहिती जमा करण्याची सवय लागली की ती सुटतच नाही. म्हणूनच तर म्हणतात ना ‘हा छंद जीवाला लावी पिसे’…