प्रॉमिसिंग – नाटय़ प्रशिक्षणाचा फायदा

तुमची मुलगी काय करतेया मालिकेतून घराघरांत पोचलेली अभिनेत्री चंद्रलेखा जोशी म्हणजे इंडस्ट्रीतील एक  प्रॉमिसिंग चेहरा.

दिवसेंदिवस सोनी मराठीवरील ‘तुमची मुलगी काय करते’ ही मालिका खूप लोकप्रिय होत आहे. यामध्ये सबइन्स्पेक्टर सीमा जमदाडे ही व्यक्तिरेखा साकारणारी अभिनेत्री म्हणजे चंद्रलेखा जोशी. चंद्रलेखा मूळची डोंबिवलीकर. तिचे वडील विवेक जोशी हे दिग्दर्शक आहेत. लहानपणापासून तिला आई -वडिलांकडून अभिनयासाठी कायमच प्रोत्साहन मिळालं. तिने लहानपणी पौराणिक, ऐतिहासिक नाटकांत भूमिकादेखील केल्या होत्या. बारावीनंतर अभिनयाचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेता यावे या दृष्टिकोनातून तिने पुण्याच्या ललित कला केंद्रात प्रवेश घेऊन तेथून ग्रॅज्युएशन पूर्ण केलं. त्यानंतर पुन्हा मुंबईत आल्यावर तिला ‘ती फुलराणी’ मालिकेत भूमिका मिळाली. ती भूमिका नकारात्मक होती आणि ‘आम्हाला तुझा राग येतो’ अशा आशयाच्या अनेक प्रतिक्रिया तिला मिळाल्या. ही खरे तर तिचा अभिनय आवडल्याची पावती होती. ‘एबी आणि सीडी’, ‘हॉस्टेल डेज’, ‘रंगीला रायबा’ या चित्रपटांत तिच्या भूमिका होत्या. हा प्रवास करता करता अचानक कोरोनाचं संकट आलं. पण त्या लॉकडाऊनच्या काळात चंद्रलेखाने ऑडिशन पाठवणे चालू ठेवले होते. त्याच काळात तिने ‘तुमची मुलगी काय करते’साठी ऑडिशन पाठवली आणि काही दिवसांनी मालिकेच्या निर्मात्या मनवा नाईक यांनी तिला भेटायला बोलावलं आणि तिथे तिची पुन्हा ऑडिशन झाली आणि तिथेच चंद्रलेखाची ‘सीमा जमदाडे’ आपल्यासमोर आली. चंद्रलेखा सांगते, आज मला सीमा जमदाडे या व्यक्तिरेखेने एक चांगली ओळख दिली आहे. ही भूमिका साकारताना मला नाटकाचं रीतसर प्रशिक्षण घेतल्याचा फायदा झाला. माझी आणि हरीश दुधाडे (इन्स्पेक्टर भोसले) यांची केमिस्ट्रीसुद्धा लोकांना आवडत आहे. या मालिकेच्या निमित्ताने अनेक मान्यवरांकडून खूप शिकता आलं.

चंद्रलेखाने ‘ऍन अरब वुमन स्पीच’ हा एकपात्री प्रयोगसुद्धा सादर केला होता. ‘समांतर 2’मध्येदेखील तिने भूमिका केली होती. अभिनयाप्रमाणे चित्रकला आणि स्पोर्टस्देखील तिला आवडत असून तिला रनिंग करायला खूप आवडतं.  अनेकविध भूमिका करून तिला एक उत्तम अभिनेत्री म्हणून स्वतःची ओळख निर्माण करायची आहे.

>> गणेश आचवल