शिवमंदिरांच्या राज्यात वसईचा रक्षक तुंगारेश्वर

>>नीती मेहेंदळे

पावसाळी दिवसांमध्ये धबधबे पाहायला जाणं हे ऐकायला जितकं रोमहर्षक वगैरे वाटत असतं तितकं ते प्रत्यक्षात नक्कीच नसतं. कारण अशा ठिकाणी चढ-उतार असतात. सततच्या पाण्याच्या सान्निध्याने शेवाळी साठून प्रचंड घसरण झालेली असते. वसईच्या तुंगारेश्वराचं महत्त्व आणि धबधब्यांची पांढरी चिंचोटी तिथेच आहे हे ऐकून होते. डोंगर हे सपाटीवरून म्हणजे दुरून साजरे दिसतातच तसेच ते माथ्यावर पोहोचलं की पण आवडतात. कारण तिथून तळातलं दृश्य खेचक दिसत असतं. तुंगारेश्वर पावसात चढणं अजिबातच सोपं नाही. कारण त्या मातीत पुष्कळ मुरूम आहे. त्या पाणी पडून तयार झालेल्या मुरुमाच्या घसरडय़ा चिखलात पाय रोवून चढाई करणं फार जिकिरीचं झालं होतं. उण्यापुऱया अर्ध्या पाऊण तासाच्या चढाईनंतर तुंगारेश्वर मंदिर नजरेस पडले.

ठाणे जिल्हा म्हणजे शिलाहारांची राजधानी श्रीस्थानक हे सर्वश्रुत आहे. शिलाहार राजे शिवभक्त होते. त्यामुळे त्यांच्या राजवटीत बांधली गेलेली अनेक शिवमंदिरं ठाणे जिह्यात सापडतात. वसई तालुक्यात पश्चिम दिशेला अरबी समुद्र आणि पूर्वेस डोंगररांग हे अगदी कोकण परंपरेला साजेसं चित्र दिसून येतं. ठाण्याहून वसईत येताना उजवीकडे दोन हजारहून अधिक फुटांवर असलेला तुंगारेश्वराचा उंच डोंगर लागतो. साहजिकच पर्जन्यकाळात इथले मनोरम धबधबे पर्यटकांचा आकर्षणबिंदू असतात. चिंचोटी नामक असेच एक आकर्षण फार पूर्वीपासून प्रचलित आहे. धबधब्याला जाणाऱया रस्त्यापूर्वी एक रस्ता तुंगारेश्वर मंदिराकडे जात होता. सदर मंदिर तसं जंगलभागात खड्डय़ात आहे. एका बाजूला आपण रस्त्याने चढून येतो तिथून खाली उतरायला पायऱया आहेत. त्या दिवशी चांगलाच पाऊस झालेला. या पाऊसकाळात मंदिरामागे असलेल्या डोंगरावर अनेक धवल माळा टाकल्यासारखे धबधबे उमळून येतात. तसे ते धबधबे, खाली नेणाऱया त्या पांढऱया संगमरवरी पायऱया आणि आजूबाजूला वेढून गर्दगच्च हिरवी वनराई असा सगळा नजारा आठवतोय.

मंदिरासंबंधी अनेक प्रवाद, दंतकथा ऐकिवात आहेत. पैकी, भगवान परशुरामाने तुंग नावाच्या असुराचा या स्थळी वध केला ही त्यातल्या त्यात पटू शकणारी गोष्ट वाटते आणि ही कथा म्हणून तुंगारेश्वर हे नामकरण झालं असावं असं म्हणता येईल. याला पाठिंबा देणारी परशुराम कुंड म्हणून एक कमान मंदिरापासून थोडय़ा अंतरावर दिसते. तिथे कुंड नसून बरीच पाण्याची टाकी आणि थोडय़ा कातळगुंफा आहेत. त्यांची निर्मिती कान्हेरीच्या काळातली असावी असे वाटते. कालांतराने इथे या काहीशा निर्जनवासात शिवमंदिर बांधले असावं. कोणी त्याची निश्चित माहिती उपलब्ध नाही. याचा अर्थ प्रस्तुत मंदिर हे अर्थातच पुरातन मंदिराची जीर्णोध्दारित आवृत्ती आहे हे आपल्या ध्यानात येतं. त्याच्या आसपास काही अजून महत्त्वाची मंदिरं आहेत. त्यात पहिलं आहे ते जागमाता देवतेचं. ही इथली ग्रामदेवता आणि तिची सध्याची मूर्ती सध्या सिंदुरलेपनाखाली असली तरी तिच्या धाटणीवरून तिचं प्राचीनत्व समजून येतं. खोडियार देवी ही गुजराथी, राजस्थानी लोकांमध्ये पुजली जाणारी देवता असून तिचं एक मोठं मंदिर तुंगारेश्वरी आहे. इसवी सनाच्या सातव्या शतकात जन्म झालेली ही देवता असून भावनगरमध्ये तिचं आद्य मंदिर आहे. तिची जन्मकथा मोठी रंजक असून तिचे वाहन मगर असतं. कालभैरवाची मोठी मूर्ती असलेलं एक मंदिर तुंगारेश्वर मंदिराजवळच आहे. असा शांत एकांतवास लाभलेल्या या मंदिरापाशी आदि शंकराचार्य तपःसाधनेसाठी येत असावेत, असाही तर्क बांधला जातो. ते काहीअंशी खरंही असेल, कारण वसईजवळ सोपाऱयामध्ये  त्यांच्या काळात बांधलेली शिवमंदिरं आहेत. शेषनागाचंही एक लहानसं मंदिर इथे आहे. तुंगारेश्वर मंदिर व चिंचोटीनंतर रस्ता नागमोडी घाटवाटांनी सरळ माथ्यावर जातो. तिथून खाली उल्हास नदीचं खोरं आणि काही मोठे जलाशय नजरेस पडतात. याच मार्गे सरळ घाट उतरू लागलं की उत्तर दिशेला माजिवली, पारोळ या गावांमध्ये आपण येतो. इथे पुरातन शिवमंदिरं असून पुरातत्व खात्याने त्यांचं संवर्धन करण्याची नितांत गरज आहे. पारोळ गावात एक मंदिर असून त्याआधी जंगलवाटेत आणखी आडवाटेवर एक अतिशय दुरवस्थेत एक शिवमंदिर आहे. त्याचं छत पूर्णतः उद्ध्वस्त आहे, शिवलिंग काय ते शाबूत दिसतं. अंबरनाथच्या मंदिराप्रमाणे एकमेकांत घट्ट बसणारे सांधे निर्माण करून या मंदिराची रचना केलेली तुटक्या बांधणीतूनही दिसून येते. मंदिराच्या प्रवेशद्वारात पायाशी असलेल्या अर्धचंद्राकृती आकाराचं साम्य ठाणे जिह्यात भिवंडी मधल्या लोनाडच्या शिवमंदिराशी जाणवतं. कदाचित ते समकालीनही असेल.

या उंच स्थानी असलेल्या तुंगारेश्वरच्या डोंगरात किल्ला नसला तर नवलच. कामण या दिवा-वसई मार्गावरच्या रेल्वे स्टेशनहून एक रस्ता तुंगारेश्वर डोंगराकडे जातो. डोंगरात खोदलेल्या दगडी पायऱया असूनही कमी परिचित असलेला कामणदुर्ग या डोंगराचं अजून एक आकर्षण आहे. पोर्तुगीजांच्या अधिपत्याखाली अधिक काळ असलेला हा दुर्ग उल्हास नदी व कल्याणच्या खाडीमधील व्यापारीमार्गावर लक्ष ठेवण्यासाठी बांधला गेला होता. हे या डोंगराचं दक्षिणेचं एक टोक आहे. याशिवाय तुंगारेश्वर हे एक राखीव अभयारण्य असून दस्तुरखुद्द मंदिर व संपूर्ण डोंगर परिसर संरक्षक वनखात्याच्या देखरेखीखाली आहे. निरनिराळे वृक्षवेली, वनस्पती तसेच जलचर, उभयचर, पशुपक्षी- कीटकादी वन्य जीवनसंस्था इथे मुबलक उपलब्ध असून त्यांचे अभ्यासक या जंगलात नियमित येत असतात. म्हणजे खरं तर बारा महिने तुंगारेश्वरचा डोंगर माणसांनी गजबजलेला असतो.

[email protected]