खंडाळा घाटात नवे बोगदे,दरडींपासून वाचण्यासाठी ‘टनेल पोर्टल’

27


सामना ऑनलाईन,मुंबई

मध्य रेल्वेच्या कर्जत ते लोणावळा घाट सेक्शनमध्ये यंदा दरडी कोसळण्याचे प्रमाण वाढले आहे. मंकी हिल ते विठ्ठलवाडी या पट्टय़ात यंदा ट्रॅकवरच दरडी कोसळल्याने दोन ते तीन वेळा वाहतूक विस्कळीत झाली होती. पूर्वी जवळून कोसळणारे दगडमाती आता थेट उंच डोंगरातून 50 ते 70 मीटर उंचीवरून घरंगळत खाली ट्रॅकवर पडत असल्याने येथील वारंवार दरडी कोसळणाऱ्या ठिकाणी प्रवाशांच्या सुरक्षेसाठी मध्य रेल्वेने बोगद्यांसमोरच पुन्हा काँक्रीटचे छोटे बोगदे ‘टनेल पोर्टल’ बांधायला सुरुवात केली आहे.

  • या संपूर्ण कामासाठी सहा कोटी रुपये खर्च करण्यात आले असल्याची माहिती मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक एस. के. जैन यांनी दिली आहे.
  • केनेडियन फेन्सिंगची उंची दोन ते तीन मीटर इतकी असून तिचा पायादेखील दोन मीटर खोल आहे. तसेच त्यांचे वजन
  • 200 ते 300 किलो इतके आहे. दरड कोसळलीच तर केवळ माती ट्रॅकवर येईल, परंतु रुळांना नुकसान पोहचविणारे दगड मात्र जाळीवरच अडकून राहतील अशी व्यवस्था करण्यात आली आहे.

केनेडियन फेन्सिंग

पावसाचे वाढते प्रमाण आणि कोसळणाऱ्या दरडींचा अभ्यास करण्यासाठी आयआयटीची मदत घेण्यात आली असून त्यांच्या सूचनेनुसार केनेडियन फेन्सिंग लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या ठिकाणी 650 मीटर जागेत केनेडियन पद्धतीच्या पोलादी पट्टय़ा ट्रकच्या सुरक्षेसाठी लावल्या असल्याने जर एखादा दगड ट्रकच्या दिशेने आलाच तर या पट्टय़ांमुळे अडकून राहून ट्रकला काहीही हानी पोहचणार नसल्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

भरपावसात ग्राऊंड स्टाफचा जागता पहारा

घाटात दोनशेहून अधिक सीसीटीव्ही लावण्यात आले आहेत. पेट्रोलिंग वाढविण्यात आली असून प्रत्येक घटनेत ट्रॅकवर दरड कोसळल्याची पहिली माहिती ट्रेनच्या लोको पायलट किंवा गार्डऐवजी ट्रकवरील पेट्रोलिंग करणाऱ्या आमच्या ग्राऊंड स्टाफनेच प्रथम दिल्याचे प्रधान मुख्य अभियंता एस. के. अगरवाल यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या