चहा सांडल्याने टर्किश एअरलाईन्सला 58 लाखांचा दंड

विमानप्रवासात अनेकदा चित्रविचित्र घटना घडत असतात. या घटनांमुळे विमानातील कर्मचारी आणि प्रवाशांमध्ये वादाचेही प्रसंग उद्भवत असतात. 4 वर्षापूर्वी असाच एक प्रकार घडला होता, ज्यामुळे टर्किश एअरलाईन्सला 58 लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

4 वर्षापूर्वी 13 वर्षांचा एमरे कराक्या आणि त्याची आई विमानाने प्रवास करत होते. एमरे हा आयर्लंडचा रहिवासी असून तो डब्लिनवरून इस्तंबूलला जाणाऱ्या विमानाने प्रवास करत होता. टर्किश हवाईसेवेच्या विमानाने हे मायलेक प्रवास करत होते. हवाईसुंदरी ही एका प्रवाशाला चहा देत असताना हा उकळता चहा एमरेच्या पायावर सांडला होता. गरम चहा सांडल्याने एमरेचा पाय चांगलाच भाजला होता. या प्रकारामुळे एमरे घाबरला होता.

एमरेच्या पायाला झालेली जखम बरी व्हायला दोन ते तीन आठवडे लागले. चहा सांडल्याने एमरेच्या पायावर भाजल्याचा डाग निर्माण झाला आहे. हा डाग आणि जखम दूर करता येईल का? असं एमरेच्या आईने एका डॉक्टरला विचारलं होतं. हा डॉक्टर प्लॅस्टीक आणि रिकन्स्ट्रक्टीव्ह सर्जन होता. या डॉक्टरने एमरेच्या पायावरील डाग आयुष्यभर तसाच राहील असं सांगितलं होतं. हे ऐकल्याने संतापलेल्या त्याच्या आईने टर्किश एअरलाईन्सच्या विरोधात खटला दाखल केला होता

खटला दाखल करतेवेळी एमरेच्या आईचे म्हटले होते की हवाईसेवेच्या निष्काळजीपणामुळे तिच्या मुलाला मानसिक आणि शारीरीक समस्यांना तोंड द्यावे लागले. न्यायालयाने एमरेच्या आईने दाखल केलेल्या खटल्यावर निकाल देताना टर्किश एअरलाईन्सला 58 लाखांचा दंड ठोठावण्यात आला.

आपली प्रतिक्रिया द्या