महात्मा गांधी हत्या प्रकरणात सावरकरांना वाचवण्यात आले, तुषार गांधींचे वादग्रस्त वक्तव्य

973

स्वातंत्र्यवीर सावरकर यांना स्वातंत्र्यपूर्व काळात जितक्या यातना भोगाव्या लागल्या तितक्याच यातना महात्मा गांधी यांच्या हत्येनंतर काँग्रेसजनांकडून देण्यात आल्या. त्या सावरकरद्वेष्टय़ांचा वारसा आजही त्यांचे अनुयायी चालवताना दिसत आहेत. त्याचाच प्रत्यय बुधवारी नाशिककरांना आला. ‘गांधी हत्या प्रकरणात स्वातंत्र्यवीर सावरकर यांना वाचवण्यात आले’ असे खळबळजनक वक्तव्य महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांची जन्मभूमी असलेल्या नाशिकमध्ये केले.

नाशिक येथे डॉ. नरेंद्र दाभोलकर विवेक व्याख्यानमालेत ‘महात्मा गांधी से गौरी लंकेश तक, राजकीय हत्याओं का सनातन सत्य’ या विषयावर गांधी यांच्या व्याख्यानाचे आयोजन केले होते. यावेळी तुषार गांधी यांनी हे खळबळजनक वक्तव्य केले. महात्मा गांधींच्या हत्येत जी प्रणाली वापरण्यात आली तशीच डॉ. नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे, कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांच्या वेळीही वापरली गेली. महात्मा गांधींच्या हत्येचा तपास नीट झाला नाही. त्यामुळे त्याचा तपास परत करण्यात यावा अशी याचिका सुप्रीम कोर्टात दाखल झाल्याची माहिती तुषार गांधी यांनी दिली. हिंदुस्थान -पकिस्तानची फाळणी झाली त्यावेळी महात्मा गांधींना विचारलेही नव्हते. महात्मा गांधींचा फक्त बळी दिला गेला, असेही तुषार गांधी म्हणाले. नथुरामला हत्यार देणाऱ्यांना का सोडले, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

मलाही मॉर्निंग वॉकची विचारणा
नथुराम गोडसे बुरखा घालून बापूंना गोळ्या घालणार होता, मात्र दोन वेळा बुरखा घातला असल्याने त्याला नीट चालता आले नाही आणि बंदूक ठेवायला खिसाही नव्हता, असा दावा तुषार गांधींनी केला. दाभोलकर बनायचे आहे का, मॉर्निंग वॉकला जाता का अशा धमक्या सध्या अनेकांना दिल्या जात आहेत. अनेक वेळा मलाही हे विचारण्यात आले की मॉर्निंग वॉकला जाता का, असे तुषार गांधींनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या