… म्हणून पत्रकारांनी केले जिग्नेश मेवाणींच्या पत्रकार परिषदेतून वॉकआऊट

फाईल

सामना ऑनलाईन । चेन्नई

गुजरातमधून पहिल्यांदाच निवडून आलेले दलित नेते आमदार जिग्नेश मेवाणी यांना पत्रकारांशी वाद घालणे महागात पडले आहे. मंगळवारी चेन्नईमध्ये आयोजित एका कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी जिग्नेश पोहोचले होते. यावेळी सामाजिक कार्यकर्ते आणि विद्यार्थ्यांनी एक पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. या कार्यक्रमासाठी प्रिंट मीडियासह टीव्ही पत्रकारही उपस्थित होते. पत्रकार परिषदेमध्ये रिपब्लिक टीव्ही चॅनेलचा माईक पाहून जिग्नेश यांचा पारा चढला आणि माईक हटवण्यास सांगितले. तसेच रिपब्लिक टीव्हीच्या पत्रकारालाही बाहेर जाण्यास सांगितले. जिग्नेश मेवाणी यांच्या अशा पवित्र्याने उपस्थित पत्रकार अचंबित झाले आणि सर्वांनी एकजुटता दाखवत गुजरातच्या नवविर्वाचित आमदाराच्या पत्रकार परिषदेचा बहिष्कार केला आणि बाहेर निघून गेले. याआधीही जिग्नेश मेवाणी यांनी रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णव गोस्वामी यांची खिल्ली उडवली होती.

एका हिंदी वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, जिग्नेश मेवाणी हे कायदे-मिल्‍लत इंटरनेशनल अकॅडमी ऑफ मीडिया स्‍टडीजच्या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी चेन्नईमध्ये आले होते. कार्यक्रम संपल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेमध्ये जिग्नेश मेवाणी रिपब्लिक टीव्हीचा माईक पाहून भडकले. ‘रिपब्लिक टीव्हीचा रिपोर्टर कोण आहे? मला रिपब्लिक चॅनेलसोबत काहीही बोलायचे नाही, असे त्यांनी म्हटले. यावेळी उपस्थित पत्रकारांनी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र रिपब्लिक टीव्हीचा माईक हटवल्याशिवाय मी कोणत्याही प्रश्नाचे उत्तर देणार नाही असा पवित्रा जिग्नेश यांनी घेतल्याने सर्व पत्रकारांनी एकता दाखवत पत्रकार परिषदेतून वॉकआऊट केले.