शिवडी मतमोजणी केंद्रात बारा विषारी साप पकडले

शिवडी गाडी अड्डा मतमोजणी केंद्रात बारा विषारी साप पकडण्यात आले. सर्पमित्रांनी या सापांना सुरक्षित स्थळी नेऊन सोडून दिले. मागील एका महिनाभरात तीसहून अधिक सापांचा वावर आढळून आला आहे.

दक्षिण मुंबई व दक्षिण-मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील मतमोजणी शिवडी गाडी अड्डा येथील गोदामात झाली. वास्तविक या भागात इतर वेळेस फारशी वर्दळ नसते. या परिसरात मोठय़ा प्रमाणावर झुडपे आहेत. लोकसभा निवडणुकीचे मतमोजणी केंद्र स्थापन करण्याचे काम एका महिन्यापूर्वी या ठिकाणी सुरू झाले तेव्हा पहिल्याच दिवशी कवडय़ा जातीचा बिनविषारी साप दिसला. त्यामुळे कर्मचाऱयांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या भागातील सापांचा वावर लक्षात घेता निवडणूक अधिकाऱयांनी मतमोजणी केंद्राच्या परिसरात सर्पमित्रांना तैनात केले होते. त्यामुळे गेल्या महिनाभरात या ठिकाणी सहा नाग, चार धामण व दोन कवडय़ा जातीचे साप आढळले. पण या सर्व सापांना सर्पमित्रांनी सुरक्षित स्थळी नेऊन सोडले.