
न्यू इंडिया बँकेत कोटय़वधी रुपयांचा मोठा घपला करणाऱ्या घोटाळेखोरांवर कारवाई सुरू असतानाच रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) सोमवारी बँकेच्या ग्राहकांना ‘अल्प’ दिलासा दिला. न्यू इंडियाच्या खातेदारांना 27 फेब्रुवारीपासून त्यांच्या खात्यातील 25 हजार रुपयांपर्यंतची रक्कम काढण्यास आरबीआयने परवानगी दिली. ठेवीदारांचे लाखो रुपये अडकले असताना प्रती ठेवीदार फक्त 25 हजार रुपये काढण्यास परवानगी दिल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेच्या ठेवीदारांना 27 फेब्रुवारीपासून त्यांच्या खात्यातील 25 हजार रुपयांपर्यंतची रक्कम काढण्यास परवानगी दिली आहे. ठेवीदार बँकेच्या शाखेत वा एटीएमचा वापर करून ही रक्कम काढू शकतात, असे आरबीआयने पत्रकाद्वारे जाहीर केले. तसेच बँकेच्या सल्लागार समितीत बदल केले. सामान्य कामगारांची बँक अशी ओळख असलेल्या न्यू इंडिया बँकेत कोटय़वधी रुपयांचा घोटाळा झाल्याची उघडकीस आले आणि प्रचंड खळबळ उडाली. बँकेवर आरबीआयने निर्बंध लादल्यानंतर दुसऱ्याच दिवशी भाजपच्या नेत्यांचा घोटाळ्यातील सहभाग उघड झाला. त्यावरून सरकार, आरबीआयवर टीका झाली. याबाबत घोटाळेखोरांवर कारवाई सुरू असताना अखेर सोमवारी आरबीआयने न्यू इंडियाच्या बँक ग्राहकांना त्यांच्या खात्यातील 25 हजार रुपये काढण्यास मुभा दिली आहे.
ठेवीदारांची आज हायकोर्टात धाव
आरबीआयने न्यू इंडिया बँकेतील घोटाळा उघड झाल्यानंतर ठेवीदारांना 5 लाखांपर्यंतची रक्कम काढण्यास मुभा देऊ, असा वादा केला होता. मात्र दहा दिवस उलटल्यानंतर अवघे 25 हजार रुपये काढण्यास परवानगी दिली आहे. उर्वरित पैसे कधी देणार, याची पुठलीही वाच्यता केली नाही. आरबीआयने केलेली ही फसवणूक आहे, अशी प्रतिक्रिया बँकिंग तज्ञ विश्वास उटगी यांनी दिली. याच अनुषंगाने आम्ही ठेवीदारांतर्फे मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करीत आहोत. मुंबई-ठाण्यातील 30 हून अधिक हाऊसिंग सोसायटय़ा, कामगार संघटना, इतर संस्था व ठेवीदार या लढय़ात सहभागी झाले आहेत, असेही त्यांनी यावेळी सांगितले.