इस्रायलचा गाझावर हवाई हल्ला, 9 लहान मुलांसह 20 जण ठार

पॅलेस्टाईनमधील कट्टरतावाद्यांची संघटना असलेल्या हमासने सोमवारी रात्री इस्रायलवर क्षेपणास्त्रे सोडली होती. याचा बदला घेण्यासाठी इस्रायलने या दहशतवादी संघटनेच्या ठिकाण्यांवर हवाई हल्ला केला. या हवाई हल्ल्यात 9 लहान मुलांसह किमान 20 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये हमासच्या एका बड्या दहशतवाद्याचाही समावेश आहे. हल्ल्यात 65 जण जखमी झाल्याचेही वृत्त आहे. डेली मेलने याबाबतचे वृत्त दिले आहे.

हमासने इस्रायलच्या दिशेने क्षेपणास्त्रे सोडल्यानंतर पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी दहशतवाद्यांना इशारा दिला होता. ‘हमासने लाल रेषा ओलांडली असून इस्रायल यानंतर लवकरच प्रतिहल्ला करेल’ असं त्यांनी म्हटले होते. ‘आमचे नागरीक, आमचे सैनिक, आमचा भूभाग यावर हल्ला झालेला आम्हाला अजिबात पसंत नसून ज्यांनी आमच्यावर हल्ला केला आहे, त्यांना याची जबर किंमत मोजावी लागेल’ असं नेतान्याहू म्हणाले होते.

इस्रायलने दावा केला आहे की गाझातून त्यांच्या दिशेने 150 क्षेपणास्त्रे सोडण्यात आली होती, यातील बरीचशी क्षेपणास्त्रे हवाई संरक्षण यंत्रणेने टिपली होती ज्यामुळे काहीही नुकसान झाले नाही. या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी इस्रायलने केलेला हवाई हल्ला हा दोन रॉकेट लाँचर्स, दोन सैनिकी तळ, हमासचे 8 दहशतवादी आणि सुरुंग उध्वस्त करण्यासाठी होता असं इस्रायलच्या सैनिकी अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

अल अक्सा मशिदीत पॅलेस्टीनी नागरीक आणि इस्रायली सैनिकांत संघर्ष

जेरुसलेममध्ये असलेल्या अल अक्सा मशिदीमध्ये जमलेल्या पॅलेस्टीनी नागरीक आणि इस्रायली सैनिकांमध्ये सोमवारी संघर्ष उसळला होता. पॅलेस्टीनी नागरिकांनी केलेल्या दगडफेकीमुळे इस्रायली सैनिकांनी त्यांच्यावर रबर बुलेटचा मारा केला. या संघर्षात 180 पॅलेस्टीनी नागरीक जखमी झाले असून त्यातील 80 लोकांची अवस्था नाजूक आहे. मशिदीच्या परिसरात जमलेल्या लोकांवर इस्रायली सैनिकांनी ग्रेनेड फेकल्याचेही वृत्त आहे.

या सगळ्या संघर्षाचे मूळ हे शेख जर्राह भागातून पॅलेस्टीनी कुटुंबांना बाहेर काढणं असल्याचं सांगण्यात येत आहे. या कुटुंबांना या भागातून बाहेर काढण्याची योजना जगासमोर आल्यानंतर इस्रायली आणि पॅलेस्टीनी यांच्यातील संघर्षाला पुन्हा सुरुवात झाली आहे. अल अक्सा मशिदीत घडलेल्या प्रकाराचा निषेध करण्यासाठी हमासने इस्रायलवर क्षेपणास्त्रे सोडली होती. अल अक्सा मशिदीतून इस्रायली सैनिक मागे घ्यावेत असं म्हणत हमासने इशारा दिला होता. यामुळे भडकलेल्या इस्रायलने गाझावर क्षेपणास्त्रे सोडली. इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यात रमझान महिन्याला सुरुवात झाल्यापासून धुसफूस सुरू झाली होती आणि गेल्या शुक्रवारपासून हिंसक झडपांच्या घटना वाढीस लागल्या आहेत.

जेरुसलेममधील अल अक्सा मशीद ही मुस्लिम धर्मियांसाठी अत्यंत महत्वाचे ठिकाण आहे. जेरुसलेम हे शहर मुसलमान, ख्रिश्चन आणि ज्यू या तीनही धर्मियांच्या लोकांसाठी अत्यंत महत्वाचे आहे. जेरूसलेमच्या पूर्वेकडच्या भागावर इस्रायलचे नियंत्रण असले तरी त्याला आंतरराष्ट्रीय मान्यता देण्यात आलेली नाहीये. पॅलेस्टाईनच्या नागरिकांची मागणी आहे की वेस्ट बँक आणि गाझापट्टीचा मिळून एक देश बनवण्यात यावा आणि त्याची राजधानी म्हणून जेरुसलेम घोषित करण्यात यावी. या सगळ्या वादातून इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यात वरचेवर संघर्ष उफाळून येत असतो. अल अक्सा मशिदीमध्ये इस्रायली सैनिकांनी केलेल्या कारवाईची मुस्लिम बहुल देशांनी निंदा केली आहे. या देशांमध्ये पाकिस्तान, सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिरातीचा समावेश आहे. रमझानच्या महिन्यात हा सगळा प्रकार घडत असल्याने तुर्कस्थानचे राष्ट्रपती रेचेप तैय्यप अर्दवान यांनीही नाराजी व्यक्त केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या