विशी-चाळिशीतील 2 लाखांवर तरुणांना कोरोना!

ज्येष्ठ आणि सहव्याधी असणाऱयांना कोरोनाचा धोका अधिक असल्याचे सांगितले जात असताना गेल्या वर्षभरात 20 ते 40 वर्षे वयोगटातील 1 लाख 96 हजार 178 जणांनाही कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. यामध्ये 419 जणांचा कोरोनाने मृत्यूही झाला आहे. त्यामुळे तरुणांनीही सर्व प्रकारची कोरोना खबरदारी घ्यावी असे आवाहन पालिकेकडून केले जात आहे.

मुंबईत 11 मार्च 2020 ला पहिला रुग्ण आढळल्यानंतर सुरुवातीच्या काळात केवळ ज्येष्ठ आणि सहव्याधी असणाऱयांना कोरोनाची लागण आणि धोका जास्त असल्याचे दिसत होते. मात्र वर्षभरात सुमारे दोन लाख तरुणांनाही कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. कोरोनाच्या दुसऱया लाटेत रुग्णसंख्या वेगाने वाढत असताना तरुणांमध्येही लागण वेगाने होत आहे.

यामध्ये 20 ते 29 वयातील 87,001 तरुणांना कोरोनाची लागण झाली असून आतापर्यंत 129 तरुणांना कोरोनामुळे जीव गमवावा लागला आहे. तर 30 ते 39 वयोगटातील तरुण शिकार होत असून आतापर्यंत 1 लाख 9 हजार 177 कोरोनाबाधित झाले आहेत. यामध्ये 380 जणांचा बळी गेला आहे.

लागण झालेल्यांमध्ये 55 टक्के मुले, 45 टक्के मुली

पालिकेच्या डॅशबोर्डच्या आकडेवारीनुसार 0 ते 9 वयोगटात आतापर्यंतच्या एकूण कोरोना रुग्णांची संख्या 9514 आहे. यामध्ये 55 टक्के मुले आणि मुलींचे प्रमाण 45 टक्के आहे.
तर 10 ते 19 कयोगटातील एकूण कोरोना रुग्णबाधितांची संख्या 24,727 अशी आहे. यामध्येही मुलांचे प्रमाण 55 टक्के आणि मुलींचे प्रमाण 45 टक्के एकढे आहे.
मुंबईत कोरोनामुळे आतापर्यंत 12 हजार 347 मृत्यू झाले असून यामध्ये 50 पेक्षा जास्त वय झालेल्यांची संख्या 10 हजार 730 आहे. सद्यस्थितीत 1396 जण अत्यवस्थ रुग्ण आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या