‘टिवटिवे’ची ११ वर्षे

37

निमिष पाटगांवकर

समर्थ रामदास स्वामींनी मनाच्या श्लोकात जे “शब्द निवडून बोलावा’’ संगितले आहे ते आजच्या जमान्यातही तंतोतंत कुठे लागू पडत असेल तर ट्विटरकरता. आपल्याला जे काही सांगायचे आहे ते केवळ १४० अक्षरांत बसवायची कला अवगत असेल तरच ट्विटरच्या वाटेला जावे नाहीतर निबंधाचे उतारे भरायला बाकीची सोशल मीडियाची माध्यमे आहेतच. २१ मार्च २००६ रोजी जन्मलेल्या या ट्विटरचा ११वा वाढदिवस जवळ आला आहे. सोशल मीडियातले त्याचे भावंड फेसबुक दोन वर्षाने मोठे आहे; पण आज लोकप्रियतेत ट्विटरने फेसबुकला चांगलीच टक्कर दिली आहे. अर्थात फेसबुक आणि ट्विटरच्या वापरण्याच्या गरजेत मूलभूत फरक आहे.

सोशल मीडियाचा वापर तुम्ही कसा करता यावर त्याचे फायदे आणि तोटे अवलंबून आहेत. आज हे निव्वळ मनोरंजनाचे व्यासपीठ न राहता एक प्रभावी संदेशवहनाचा, मार्केटिंगचा पर्याय म्हणून बघितले जाते. आजच्या डिजिटल मार्केटिंगच्या जमान्यात ट्विटरचा उपयोग इतका प्रभावीपणे केला जातो की या १४० अक्षरांच्या चौकटीत जे बसवले जाते ते लाखो रुपये खर्चून केलेल्या जाहिरातीपेक्षा प्रभावीपणे मांडले जाते. हिंदुस्थानचा विचार केला तर डिजिटल इंडिया संकल्पनेचा मुहूर्त केल्यापासून ट्विटरचा प्रभावी उपयोग सरकारी कामापासून ते खाजगी उद्योगात अधिकृतपणे आणि सर्रास सुरू झाला आहे. दूरच्या प्रवासाच्या रेल्वेगाडीत तुमच्या डब्यात काही गैरसोयी असल्या आणि तुम्ही रेल्वे मंत्रालयाला त्याबद्दल ट्विट केले तर अगदी पुढच्या काही स्टेशनात रेल्वे कर्मचाऱ्यांनी डब्यात येऊन अडचणी दूर केलेली उदाहरणे आता सहज ऐकू येतात. तुमच्या कुठच्याही सेवेबद्दल तक्रार करायला तक्रार निवारण केंद्रात फोन करून वाट पाहत बसण्याऐवजी एका ट्विटने हल्ली काम झटपट होऊ शकते. याला मुख्य कारण म्हणजे आजच्या स्पर्धेच्या जगात कुठचीही सेवा देणारी संस्था सर्वात कशाला घाबरत असेल तर सोशल मीडियावरून होणाऱया अपप्रचाराला. सोशल मीडियावरून बातमी पसरायचा वेग वाऱयाचा असतो आणि त्याचा परिणामही तितक्याच झपाट्याने होतो.

एखाद्या व्यक्तीशी किंवा संस्थेशी ट्विटरने संपर्क साधणे किंवा त्यांचा मागोवा घेणे हे ट्विटरवर फेसबुकपेक्षा जास्त सोपे जाते. फेसबुकवर मित्र जोडायची जी मर्यादा आहे ती ट्विटरवर नसते. २०१६च्या अखेरच्या आकडेवारीनुसार जगात ३२ कोटी लोकं ट्विटर वापरत आहेत. हिंदुस्थानी व्यक्तींच्या ट्विटर वापराबद्दल बोलायचे तर पावणेतीन कोटी ट्विटर वापरणारे पंतप्रधान मोदींचे ट्विट बघत असतात, तर अडीच कोटी अमिताभ बच्चन काय सांगतो हे बघायला उत्सुक असतात आणि सव्वा दोन कोटी शाहरुख खानचे ट्विट वाचत असतात.

समाजातल्या प्रसिद्ध व्यक्तींच्या ट्विटला महत्त्व असल्याने त्याचा वापर आज डिजिटल मार्केटिंगच्या युगात खुबीने केला जातो. प्रत्येक क्षेत्रातल्या ज्या महत्त्वाच्या व्यक्तींचे ट्विटरवर चाहते काही हजारात किंवा लाखात आहेत त्यांना त्या क्षेत्रातले “इन्फ्लूएन्सर्स’’ म्हणतात म्हणजेच प्रभावी व्यक्तिमत्त्व. त्यांच्या क्षेत्रातले एखादे नवे उत्पादन किंवा सेवा कुठच्या कंपनीला सुरू करायची असेल तर अशा इन्फ्लूएन्सर्सना जाहिरात कंपन्या गाठतात आणि त्यांना त्या नवीन उत्पादन किंवा सेवेबद्दल ट्विट करायला सांगतात. एकेका ट्विटचे हे इन्फ्लूएन्सर्स काही हजारांपासून ते लाखांपर्यंत मानधन घेतात. एकदा का या प्रसिद्ध व्यक्तींनी ट्विट केले की ते ट्विट पद्धतशीरपणे “ट्रेंडिंग’’ सदरात राहील याची काळजी घेतली जाते. ज्या घडीला सर्वात जास्त ट्विटस प्रचारात असतात ती ट्रेंडिंग म्हणून त्यावेळेपुरती मान्यता पावतात. थोडक्यात त्यांची प्रसिद्धी जास्त होते आणि टिव्हीवरच्या पडद्यावर जाहिरातीच्या आभासी जगात एखादे उत्पादन जसे सर्वोत्कृष्ट भासवले जाते तसेच या दोन ओळींच्या जाहिरातीतून भासवले जाते. एखादी बातमी असो, निवडणुकांचे निकाल असो वा खेळाचा सामना असो, आजच्या ब्रेकिंग न्यूजला वाचा फोडायला ट्विटच पहिले धावून येते. गेल्या नोव्हेंबरमध्ये झालेल्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाच्या निवडणुकीत दिवसभरात जवळजवळ ४ कोटी ट्विट ब्रेकिंग न्यूजच्या स्वरूपात करण्यात आले.

अकरा वर्षापूर्वी जन्मलेल्या या बाळाने आता चांगलेच बाळसे धरले आहे. ट्विटच्या अक्षरांवरचे बंधन बघता मूर्ती लहान पण कीर्ती महान असेच या सोशल मीडियाच्या अपत्याचे वर्णन करावे लागेल. अर्थात या महाजालात सर्वसामान्य तर करतातच, पण काही महान लोकं खरंच नको इतके ट्विट करत असतात. तेव्हा “शब्द निवडून बोलावा’’ हे तंत्र पाळले तरच या माध्यमाची महती कळून येते नाहीतर उरतो तो निव्वळ टिवटिवाट.

आपली प्रतिक्रिया द्या