कचरा वेचणाऱ्या महिलांवर सामूहिक बलात्कार करणाऱ्यांना फाशीची शिक्षा

14

सामना ऑनलाईन, नवी मुंबई

दिल्लीतील निर्भया प्रकरण आणि पुण्यातील नयना पुजारी प्रकरणानंतर नवी मुंबईतील सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणी ठाणे सत्र न्यायालयाने २ दोषींना फाशीची शिक्षा सुनावली आहे. सहीमुद्दीन शेख उर्फ झॉनी अँथोनी(वय-२९ वर्ष) आणि संदीप शिरसाट उर्फ रघू रोकडा(वय-२५ वर्ष) अशी आरोपींची नावे आहेत. या दोघांना सीबीडी बेलापूर उड्डाणपुलाखाली कचरा वेचणाऱ्या दोन महिलांवर बलात्कार केला होता. त्यानंतर या महिलांवर जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यामध्ये एक महिला वाचली होती आणि तिची साक्षच या दोघांना फाशीपर्यंत पोहोचवण्यात महत्त्वाची ठरली आहे.

या दोन्ही दोषींनी ९ मे २०१२ रोजी महिलांवर बलात्कार करण्यापूर्वी त्यांना कोल्डड्रींकमध्ये दारू मिसळून जबरदस्तीने पाजली होती. बलात्कार केल्यानंतर या महिलांनी पोलिसांत तक्रार करू नये म्हणून त्यांनी दोन्ही महिलांचे गळे कापले. सुदैवानं यातील २० वर्षांची महिला वाचली आणि तिने कसंबसं पोलीस स्टेशन गाठत तक्रार केली. सरकारी वकील संगीता फड यांनी शिक्षेसंदर्भातील युक्तिवाद करताना म्हटलं होतं की, या दोघांनी जे कृत्य केलं आहे ते अत्यंत निर्दयीपणे केलेलं आहे आणि त्यांच्या या कृत्याबद्दल त्यांना अत्यंत कठोर शिक्षा झालीच पाहिजे. शिक्षेसंदर्भातील युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने या दोघांना फाशीची शिक्षा देण्याचा निर्णय जाहीर केला.

आपली प्रतिक्रिया द्या