ऑनलाईन फसवणूक करणारे २ राजस्थानी भामटे जेरबंद

24

सामना प्रतिनिधी । जालना

जालन्यातील एका पोलिसाकडून ३ वेळा पेटीएमव्दारे १२ हजार ५०० रूपये घेवून, त्यांना आयफोन मोबाईल न देता, त्यांची ऑनलाईन फसणूक करणाऱ्या राजस्थानच्या २ भामट्यांना जालना साबयरचे प्रमुख पोलिस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर व त्यांच्या टीमने अटक केली. त्यांच्याकडून मोबाईल, १० सिमकार्ड जप्त करण्यात आले आहे. या टोळीच्या चौकशीतून अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. अटक केलेल्या दोघांमध्ये मुरसलीम फरजू खान रा. घोघोर ता. कामन जि. भरतपुर, सद्दाम खान कासु खान रा. झेंजुरी ता. कामन, जि. भरतपुर, राजस्थान यांचा समावेश असून, दोघांनाही १५ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

ऑगस्ट महिन्यात जालना ओएलएक्स या संकेतस्थळावर आयफोन मोबाईल विक्रीची जाहिरात होती. त्यावरून पो. हेड कॉन्स्टेबल अभिषेक शिरगुळे यांनी एक आयफोन खरेदी केला. मोबाईलच्या मालकाच्या खात्यावर ३ वेळा पेटीएमव्दारे १२,५०० रूपयेट्रान्सफर केले. मात्र, मोबाईल मिळाला नसल्याने त्यांची फसवणूक झाली. शिरगुळे यांनी पोलिसात तक्रार दाखल केली. त्यानुसार सायबर शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर यांनी या प्रकरणाचा सखोल तपास केल्यानंतर शिरगुळे यांच्या खात्यातील रक्कम ही राजस्थान राज्यात वर्ग झाल्याची माहिती मिळाली. तसेच पो. हेड कॉन्स्टेबल शिरगुळे यांच्या ओळखपत्राच्या आधारे या आरोपींनी वेगवेगळ्या राज्यातील इसमांना फसविले असल्याचे निदर्शनास आले.
राजस्थान राज्यातील झेंजपुरी ता. कामन जि. भरतपुर येथे सायबरचे पथक त्यांना शोधण्यासाठी गेले असता, आरोपींनी तेथून पोबरा केला. दरम्यान, पुणे-सातारा रोडवर सदरहू आरोपी असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी शिताफीने आरोपींना अटक केली. त्यांना जालना येथे तपासासाठी आणले आहे. अशा प्रकारचे फसवणूक झालेल्या गुन्ह्यांची माहिती पोलिसांकडून गोळा केली जात आहे. या टोळीकडून अनेक राज्यांतील गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.

पोलिस अधिक्षक रामनाथ पाकळे, अप्पर पोलिस अधिक्षक लता फड यांच्या मार्गदर्शनाखाली पो. निरीक्षक राजेंद्रसिंह गौर, प्रभारी अधिकारी बी. डी. बोरसे, भालचंद्र गिरी, लक्ष्मीकांत आडेप, सागर बावीस्कर, सतीश गोफणे, शिवप्रसाद एखंडे, शेख इरफान शेख, योगेश सहाणे, महिला पोलिस कर्मचारी संगीता चव्हाण व अर्चना आधे यांनी ही कामगिरी पार पाडली.

आपली प्रतिक्रिया द्या